दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, चिचोली एकमेकांशी जोडले जाणार : नियोजन करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशनागपूर : दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस व चिचोली येथील डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचे वस्तू संग्रहालय ही तीनही धार्मिक स्थळे ‘बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’ म्हणून एकमेकांशी जोडली जातील, असे नियोजन करा. तसेच या तीनही स्थळांच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव पुन्हा नव्याने तयार करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.या तीनही धार्मिक स्थळांचा विकास आणि सौंदर्यीकरणासंदर्भात एक बैठक रविभवन येथे पालकमंत्र्यांनी शुक्रवारी घेतली. बैठकीला माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे, आमदार प्रकाश गजभिये, सुधाकर देशमुख, समीर मेघे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, विजय चिकाटे व अन्य उपस्थित होते. दीक्षाभूमी ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण यावेळी झाले. विकास कामांची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासकडे आहे. ३२५ कोटींच्या खर्चाचा विविध कामांचा आराखडा तयार करण्यात आला. दीक्षाभूमी परिसर २२.८ एकर जागेत आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या आराखड्यात आणखी सुधारणा सुचविण्यात आल्या. जी जागा उपलब्ध आहे त्या जागांचा विकास व परिसराचे सौंदर्यीकरणाचा विचार प्राधान्याने करण्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.कामठी येथील बौद्ध बांधवांचे धार्मिक स्थळ ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’लाही ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक व्यवस्थापक पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आला. एकूण २१४.५० कोटींचा हा प्रस्ताव आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटर, कोमोडेशन हॉल विपश्यना सभागृह, बुद्धिस्ट थिम पार्क, म्युझियम व लायब्ररी, वाहनतळ, संरक्षण भिंत, परिसराचा विकास व सौंदर्यीकरण, सॅनटरी, विद्युतीकरण आदी कामांचा या प्रस्तावात समावेश आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या या प्रस्तावाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.कळमेश्वर रोडवर मौजा चिचोली येथील खसरा क्रमांक १२८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दिवंगत वामनराव गोडबोले यांच्या मालकीच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे वैयक्तिक वापरातील विविध वस्तूंचे संग्रहालय आहे. या वस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात मेमोरियल अॅण्ड म्युझियम, मास ट्रेनिंग सेंटर, विपश्यना केंद्र, आनापानसती केंद्र, माक्स रेसिडेन्स, कॅफेटोरिया, स्टॉल्स, डायनिंग हॉल, टीचर्स कॉटेजेस, स्टाफ क्वार्टर्स, स्टुडंट्स रेसिडेन्स, होस्टेल, सार्वजनिक शौचालय आदींचा समावेश आहे. या कामांसाठी ४० कोटी व अधिक निधीची गरज असल्यास निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. आ. प्रकाश गजभिये यांनी आराखड्यात सुधारणा व नवीन कामांचा समावेश करण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांनी नव्याने सुचविलेल्या कामांचा समावेश या प्रकल्पात करण्यात येऊन खर्चाच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे. येणारे भाविक विकासामुळे आकर्षित व्हावेत असा आराखडा तयार करावा, अशी सूचनाही आ. गजभिये यांनी केली.(प्रतिनिधी)
उपराजधानी होणार ‘बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’
By admin | Updated: June 4, 2016 02:54 IST