कॅडरसाठी सर्वकाळ उपलब्ध : प्रसंगी निवासाची सोयही केली जाते नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या नागपुरातील विस्ताराचे जेवढे श्रेय कॅडरला जाते, तेवढेच पक्षाच्या मुख्य कार्यालयाही जाते. नारी रोडवर असलेले बसपाचे मुख्य कार्यालय ‘बहुजन भवन’ आठवड्यातून सातही दिवस २४ तास सुरू असते. येथे येणाऱ्या कार्यकर्त्याला आवश्यक ते प्रचार, प्रसार साहित्य उपलब्ध तर करून दिले जातेच पण सोबतच आंबेडकरी विचार मांडण्यासाठी विचारवंतांचे ग्रंथ व पुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात. एवढेच नव्हे तर पक्षाच्या कामासाठी बाहेरगावाहून येणारा कार्यकर्ता हा आपलाच आहे याची जाणीव ठेवत प्रसंगी त्याच्या निवासाची व्यवस्थाही येथेच केली जाते. असे आहे कार्यालय सम्यक नगर (सन्याल नगर), नारी रोड, कांशीराम मार्ग येथे सुमारे पाच हजार चौरस फुटाच्या जागेवर बसपाचे मुख्य कार्यालय आहे. संपूर्ण कार्यालय पक्षाच्या मालकीचे आहे. बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी १९८४ मध्ये या कार्यालयाचे उद्घाटन केले. प्रदेश अध्यक्ष विलास गरुड, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर व आॅफिस इंचार्ज कृष्णा बेले व जितेंद्र म्हैसकर यांचे स्वतंत्र कक्ष आहेत. याशिवाय येथे एक कॉन्फरन्स हॉल आहे. या हॉलमध्ये शंभर कार्यकर्त्यांची बैठक सहज होऊ शकते. कार्यकर्त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी किचन रुम आहे. प्रचार साहित्य ठेवण्यासाठी एक स्टोअर रुम आहे. कार्यालयात वीजपुरवठा, संगणक, इंटरनेट आदी सुुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय रामेश्वरीत आणखी एक शहर कार्यालय आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मायावती यांच्याहस्ते १९८६ मध्ये झाले होते. बामसेफ उचलते खर्चबसपाच्या कार्यालयात वीज, पाणी, स्वच्छता, देखभाल दुरुस्ती, कर्मचारी आदी कामांसाठी होणारा खर्च पक्षातर्फे मिळत नाही, तर बामसेफतर्फे हा सर्व खर्च केला जातो. पक्ष कार्यालयाला काम करताना कुठलीही अडचण जाणार नाही, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी बामसेफतर्फे घेतली जाते. विशेष म्हणजे या कामासाठी बामसेफकडून कधीच दिरंगाई होत नाही. असे चालते कामकाजबसपाचे कार्यालय २४ तास सुरू असते. दोन शिफ्टमध्ये दोन कर्मचारी येथे काम करतात. रामराव निकाळजे हे ज्येष्ठ कार्यकर्ते गेल्या ३० वर्षांपासून येथे काळजीवाहक म्हणून काम पाहत आहेत. आॅफिस इन्चार्ज म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले व प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर हे दररोज दुपारी ४ नंतर कार्यालयात येतात. जिल्हाध्यक्षही दररोज हजेरी लावतात. पक्षातर्फे येणाऱ्या सूचना प्रभागांपर्यंत पोहचविण्याचे काम येथूनच केले जाते. मीडिया प्रभारी सागर डबरासे व ज्येष्ठ नेते उत्तम शेवडे हे येथूनच प्रचार, प्रसार व प्रसिद्धीचे काम पाहतात. महिन्यातून एकदा शहर कार्यकारिणीची नियमित बैठक होते. याशिवाय विविध विषयांच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू असतात. ग्रंथालयाची सोयनारी रोडवरील बसपाच्या कार्यालयात ग्रंथालयाची सोय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्यासह बहुजन महापुरुषांचे ग्रंथ व साहित्य येथे वाचण्यासाठी उपलब्ध आहे. याशिवाय बसपाचा विचार सांगणारे, प्रसार करणारे बरेचसे साहित्य येथे वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. पक्षाचा विचार जनतेत व विविध व्यासपीठावर मांडणाऱ्या वक्त्यांना अध्ययनासाठी या साहित्याचा मोठा उपयोग होतो. लखनौ, दिल्लीहून येथे प्रचार साहित्य बसपाच्या प्रचार, प्रसारासाठी लागणारे मोठमोठे कट आऊट, होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर, तोरणे व प्रचार साहित्य लखनौव दिल्ली येथून ट्रकने या कार्यालयात पाठविले जाते. येथील स्टोअर रुममध्ये हे साहित्य ठेवून निवडणुकीच्या काळात मागणीनुसार ते विविध प्रभागात वितरित केले जाते. पक्षाकडून येणारे बहुतांश प्रचार साहित्य हिंदीमध्ये असते. ते साहित्य गरजेनुसार मराठीत भाषांतरित करून नंतर ते प्रकाशित करण्याची जबाबदारी नागपूर कार्यालयात पार पाडली जाते.
बसपाचे ‘बहुजन भवन’ २४ तास सेवेत
By admin | Updated: September 28, 2016 03:05 IST