नागपूर : नागपूरच्या झिरो माईल परिसरात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना एका तरुणाने फोन करून घटनेची माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोहचले.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यांचे कपडे आणि केस विस्कळीत असल्याने त्यांच्यावर लैगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. वृद्ध महिलेचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याने त्या परिसरात फिरायच्या आणि भीक मागायच्या. गुन्हा घडलेल्या ठिकाणी रक्ताने माखलेला दगड पोलिसांच्या हाती लागला. त्याच दगडाने वृद्ध महिलेची हत्या केल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. तरी वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाला की नाही याची पुष्टी पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आल्यानंतर कळेल. या घटनेमुळे उपराजधानीत वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.