विकास सिरपूरकर : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्रनागपूर : पत्रकारिता हे सामान्य काम नाही. पत्रकारांच्या लिखाणाने जनता प्रभावित होते. त्यामुळे पत्रकाराचे डोळे हे ‘एक्सरे आईज’व बुद्धी ही प्रचंड शार्प असणे गरजेचे आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात शिरलेल्या ‘हेड’,‘मेड’,‘पेड’ न्यूजमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावतो आहे. असे असले तरी, आशावादी राहून स्वच्छ चारित्र बाळगून, सापेक्षी वृत्तीने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा, तरच पत्रकारितेत पारदर्शिता येईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘सार्वजनिक कामकाजातील पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य व वरिष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक मोहन राठोड, विभागीय माहिती केंद्रातील जिल्हा माहिती अधिकारी दिलीप कुळकर्णी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एस. त्रिपाठी, सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते. यावेळी सिरपूरकर यांनी प्रिंट मीडिया कसा बलशाली आहे, याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, पत्रकार जे लिहितो, ज्या टीका करतो, जे विचार मांडतो, त्या विचाराशी तो जुळलेला असतो. हे विचार तो अक्षराच्या माध्यमातून वृत्तपत्रातून प्रकट करतो. आणि अक्षर कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे पत्रकाराने जबाबदारी ठेवून पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना प्रकाश दुबे यांनी पत्रकारिता जगताचे सध्याचे काय स्वरूप आहे, त्यात बदल करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, यावर विवेचन केले. ते म्हणाले की मीडिया हे संवादाचे माध्यम राहिलेले नसून ते सत्तेचे माध्यम झालेले आहे. या माध्यमावर आंतरिक आणि बाहेरूनही संकटाचे सावट आहे. पत्रकारितेच्या परिवर्तनासाठी तिसऱ्या प्रेस आयोगाची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकारिता क्षेत्रात साधन वाढले आहे, मात्र संवेदना कमी झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी या क्षेत्रात कार्य करताना संवेदना हरवू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा
By admin | Updated: November 18, 2014 00:50 IST