८४ ट्रॅप ११२ जाळ्यात : जंगलात बोकाळला भ्रष्टाचार जीवन रामावत नागपूर आतापर्यंत लाचखोरीच्या क्रमवारीत आघाडीवर समजल्या जाणाऱ्या महसूल आणि पोलीस विभागानंतर आता वन विभागानेही आघाडी घेतली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याच्या वन विभागात टाकलेल्या ८४ धाडीत तब्बल ११२ लाचखोर वन अधिकारी व कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. सध्या वन विभागाला लागलेली ‘लाचखोरी’ ही कीड संपूर्ण जंगल पोखरत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. नुकत्याच बुधवारी काटोल येथील वन परिक्षेत्र अधिकारी अशोक माकडे आणि नागपूर सर्कलचा शाखा अभियंता अनिल पडोळे ३ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. या घटनेने वन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पूर्वी भ्रष्टाचार म्हटले की, महसूल आणि पोलीस विभागाकडेच बोट दाखविल्या जात होते, परंतु वन विभागातील या आकडेवारीने जंगलात सुद्धा तेवढाच भ्रष्टाचार बोकाळलेला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या विभागाचा सामान्य जनतेशी फारसा संबंध येत नाही. त्यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याच्या यापूर्वी अनेक घटना पुढे आल्या आहेत. यातच आता लाचखोरांनी कळस गाठला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी नागपूरचे उपवनसंरक्षक दीपक भट यांना चक्क रोख १९ लाख रुपयांसह एसीबीने अटक केली होती. या पाठोपाठ आरएफओ ढोले व आरएफओ पाटील यांच्यासह खापा येथील एका वनरक्षकाला लाच घेताना पकडण्यात आले होते. अशा घटनांमुळे वन विभागातील लाचखोरांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
वन विभागाला ‘लाचखोरी’ची कीड
By admin | Updated: March 17, 2017 03:05 IST