एसीबीची खापरखेड्यात कारवाई : ५० हजार रुपयांची मागितली लाच, महानिर्मितीत खळबळ खापरखेडा : महानिर्मितीच्या खापरखेडा येथील वीज प्रकल्पात वाहन पुरविण्याचा कंत्राट मिळवून देण्यात मदत केल्याबाबत तसेच थकीत बिलांची रक्कम मिळवून देण्यासाठी कंत्राटाच्या एकूण रकमेच्या तीन टक्के अर्थात ३ लाख ७५ हजार रुपयांची अधीक्षक अभियंत्याने कंत्राटदारास लाच मागितली. यातील पहिल्या टप्प्यातील ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी - अॅन्टी करप्शन ब्युरो) त्या लाचखोर अधीक्षक अभियंत्यास अटक केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी वीज केंद्राच्या परिसरात करण्यात आली. हिंमत खंडेराव अवचार असे अटक करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे. अवचार हे खापरखेडा वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात कार्यरत आहेत. तक्रारकर्ते हे नागपूर येथील रहिवासी असून, ते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. ते महाजेनकोच्या खापरखेडा वीज केंद्राला २००९ पासून कंत्राटी पद्धतीने वाहने पुरवितात. महाजेनकोने २०१६-१७ या वर्षासाठी वाहने पुरविण्याकरित ई निविदा दिल्या होत्या. तक्रारकर्त्याचा कंत्राट संपल्याने त्यांनी ही निविदा भरली होती. शिवाय, त्यांना वाहने पुरविण्याचा १ कोटी २५ लाख रुपयांचा कंत्राटही मिळाला होता. हा कंत्राट मिळवून देण्यासाठी आपण मदत केली असून, थकीत बिले काढण्यासाठी अवचार यांनी तक्रारकर्त्यास कंत्राटाच्या एकूण किमतीच्या तीन टक्के अर्थात ३ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तक्रारकर्त्यांस सदर रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी शनिवारी सकाळी या संदर्भात नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने सायंकाळी खापरखेडा वीज केंद्राच्या परिसरात सापळा रचला. तक्रारकर्त्याने अवचार यांना ५० हजार रुपये देताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महानिर्मितीमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक ज्ञानदेव घुगे, पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार, सचिन म्हेत्रे आदींनी केली. (प्रतिनिधी)
लाचखोर अभियंत्यास अटक
By admin | Updated: February 5, 2017 02:15 IST