आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळ बदलत आहे, जग झपाट्याने पुढे जात आहे. मात्र जातीभेद, रुढी, परंपरेचा पगडा आजही समाजावर दिसून येतो. प्रेमविवाहाबाबत लोकांची भूमिका आजही सकारात्मक नाही. त्यामुळे आजही आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्यांना कौटुंबिक व सामाजिक बहिष्कारासारखा संघर्ष सहन करावा लागतो. अशा परिस्थितीतही ज्यांनी जातीच्या भिंती झुगारून प्रेमविवाह केला आणि सुखाचा संसार फुलविला अशा दाम्पत्यांना सोमवारी जि.प.च्या समाजकल्याण विभागातर्फे सन्मानित करण्यात आले. जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्ह्यातील ३०८ आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. शासनातर्फे समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यात येते. त्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम भेट देण्यात येते. जि.प.मध्ये हा कार्यक्रम सोमवारी साजरा झाला. यात ३४ आंतरजातीय विवाह केलेल्या दिव्यांगाचाही समावेश होता. या ३०८ जोडप्यांना १ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष निशा सावरकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष शरद डोणेकर होते. व्यासपीठावर समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम, अर्थ समितीचे सभापती उकेश चव्हाण, सत्तापक्ष नेता विजय देशमुख, जयकुमार वर्मा, शिवकुमार यादव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, विनोद पाटील, शांता कुमरे, नंदा नारनवरे, शुभांगी वैद्य, सरिता रंगारी, शकुंतला वरखडे, योगिता चिमूरकर, वंदना पाल, कल्पना चहांदे, सुरेंद्र शेंडे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांग, अव्यंग, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना धनादेश व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संसार टिकविण्यासाठी वकिलांकडे जाऊ नकासंसारात वाद होतच असतात. पण वादाचे रूपांतर नाते तुटेपर्यंत जाऊ देऊ नका. इतरांजवळ मनमोकळे करा. मात्र, अशा परिस्थितीत वकिलांचा सल्ला कदापिही घेऊ नका. त्याऐवजी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. त्यांना मध्यस्थी करण्यास भाग पाडा. कारण, वकील नाते तोडण्याचा सल्ला देतील पण ज्येष्ठ संसार टिकवण्याचाच सल्ला देतील, असा सल्ला अध्यक्ष निशा सावरकर यांनी उपस्थित दाम्पत्यांना दिला.
आम्ही झुगारल्या जातीच्या भिंती
By admin | Updated: June 6, 2017 02:04 IST