लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सोनेगावमध्ये व्यावसायिकाच्या घरी झालेल्या धाडसी घरफोडीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. ही घरफोडी करणाऱ्या चारपैकी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० लाख, ६१ हजार, ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, परिमंडळ तीनचे उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुधीर नंदनवार उपस्थित होते.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परफेक्ट सोसायटीत राहणारे तिमापुरम गुणकेसर रेड्डी (वय ६१) हे सहपरिवार गोव्याला गेले असता त्यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ३० लाख, ४७ हजारांचा ऐवज लंपास केला होता.
रेड्डी यांचे शेजारी संदीप गजलवार यांनी ही माहिती दिल्यानंतर रेड्डी गोव्यातून नागपुरात परतले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ९ डिसेंबरला सोनेगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त फुलारी, उपायुक्त राजमाने आणि सहायक आयुक्त नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. अट्टल गुन्हेगार मयूर भास्करराव बाबळे (जयताळा), विनोद बिसनरावजी कुंभरे (सालई, कोंढाळी), राम मडावी (कोंढाळी) आणि अक्षय वरुडकर (कोंढाळी) यांनी ही घरफोडी केल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांनी आरोपी बाबळे आणि कुंभरेच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह २० लाख, ६१ हजार, ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींचे दोन साथीदार फरार असून, त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल, असे फुलारी यांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक विजय तलवारे, किशोर पर्वते, सहायक निरीक्षक गणेश पवार, संकेत चौधरी, उपिनरीक्षक राजकुमार त्रिपाठी, बलराम झाडोकर, धर्मदास सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
---
गंगाजमुनात छापा, वारांगनासह ग्राहकही जेरबंद
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त मतानी यांनी २१ पोलीस अधिकारी आणि ९४ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गंगाजमुनात गुरुवारी रात्री छापा मारला. यावेळी तेथे ८७ वारांगना आणि २३ ग्राहकांना पकडून त्यांच्याविरुद्ध पोक्सो, पीटा तसेच संघटितपणे मानवी तस्करी करण्याच्या आरोपाखाली लकडगंज ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. येथून ४ महिला तसेच ८ अल्पवयीन मुलींचीही सुटका करण्यात आल्याचे उपायुक्त मतानी यांनी पत्रकारांना सांगितले.
---
असल्या प्रश्नाला उत्तर देणार नाही - फुलारी
या पत्रकार परिषदेत दुहेरी हत्याकांडाच्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. चिमुकल्यासह आजीची हत्या करून आरोपी तब्बल १० तास शहरात फिरत होता. मित्रांना फोन करीत होता. त्यामुळे त्याचे लोकेशन्सही डिटेक्ट झाले होते. असे असताना त्याला पोलीस का पकडू शकले नाही,असा प्रश्न विचारला असता अतिरिक्त आयुक्त फुलारी यांनी ‘असल्या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही’, असे म्हटले. यामुळे पत्रपरिषदेचा नूरच पालटला होता.
---