नागपूर : गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्ष आम्ही वेगळे असल्याचे नाटक करीत असले तरी ते एक आहेत. एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे. एकाच शिक्क्याचे दोन भाग आहेत. काँग्रेस व भाजप दोन्ही शेतकरी व बहुजन विरोधी असून त्यांच्या लुटारु धोरणामुळे शेतकरी आणि दलित, बहुजन समाज त्रस्त झाला आहे. या देशात केवळ भाजपा, संघ आणि उद्योगपतींचेच चांगले दिवस आले असून देशातील सामान्य नागरिकांचे मात्र वाईट दिवस सुरू झाले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी शनिवारी जाहीरपणे केली. केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयक आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे राष्ट्रीय स्तरावर धरणे निदर्शनांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खा. वीरसिंह हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणा पोकळ असल्याचे लोकांना समजले आहे. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या मनपा व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाडी व औरंगाबादेत लोकांनी भाजपाला नाकारले आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव हरीश बेलेकर, रमेश जनबंधू, अहमद कादर, उत्तम शेवडे, दादाराव उईके, प्रभाकर गेडाम, झेड.आर. दुधकुंवर, प्रेम रोडेकर, दत्तराव धांडे, नाना देवगडे आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी विवेक हाडके, राजेंद्र पडोळे, कविता लांडगे, संजय जयस्वाल, महेश सहारे, गौतम पाटील, सागर डबरासे, जितेंद्र घोडेस्वार, योगेश लांजेवार, तपेश पाटील उपस्थित होते. राजकुमार बोरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भाजपा-काँग्रेस दोन्ही शेतकरी विरोधी
By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST