क्रिकेट बुकी खून प्रकरण :आणखी दोघांना अटकनागपूर : हुडकेश्वर रोड राजापेठ येथे झालेल्या ‘ टॉपर’ क्रिकेट बुकी शीतल राऊत खूनप्रकरणी नव्याने अटक करण्यात आलेल्या आणखी दोन जणांसह सहा आरोपींना आज तपास अधिकाऱ्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. आर. लोहिया यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. आशिष काळे आणि राहुल गणवीर, अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी श्रीकांत ऊर्फ चिंगा महादेव थोरात , राजू ऊर्फ बल्ली परसराम शिंदे , राजेश ऊर्फ राजू अण्णा मधुकर मस्के आणि रोशन ऊर्फ गोट्या अशोकराव मोहिते यांना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींनी कट रचून शीतल राऊत याचा निर्घृणपणे खून केल्याने आरोपींविरुद्ध भादंविच्या १२० ब तसेच मुख्य आरोपी श्रीकांत आणि राजू शिंदे यांनी रक्ताने माखलेले स्वत:चे कपडे जाळले. पुरावा नष्ट केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविचे २०१ हे कलम वाढविण्यात आले, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जी. पी. इंगळे यांनी न्यायालयाला सांगितले. आरोपींनी मृताचा मोबाईल बेपत्ता केला. तो त्यांच्याकडून जप्त करणे आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करणे आहे. आरोपींपैकी श्रीकांत थोरात हाही क्रिकेट सट्ट्याची लगवाडी घेऊन गोव्यात असलेला मृताचा भाऊ बडा बुकी अजय राऊत याच्याकडे उतरवायचा. त्यामुळे श्रीकांतचा सीडीआर प्राप्त करून झालेली कोट्यवधीच्या उलाढालीची माहिती प्राप्त करणे आहे. सरकार पक्षाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मागितला. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अॅड. लुबेश मेश्राम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)‘ते’ पावणेदोन कोटीभोपाळ येथे अजय राऊत आणि नागपुरातील सर्वच बडे क्रिकेट बुकी लग्नसमारंभासाठी गेले होते. येथील एका हॉटेलमध्ये बुकींनी मोठा जुगार भरवला होता. या जुगारात अजय राऊत पावणेदोन कोटी रुपये जिंकला होता. तो नागपुरात परत येताच त्याचा भाऊ शीतल याचा खून झाला, ही माहिती क्रिकेट सट्टा व्यवसायातील सूत्रांनी दिली.
आरोपींनी जाळले रक्ताळलेले कपडे
By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST