मेडिकलकडे डिझेलसाठी निधीच नाही: आदर्श रक्तपेढीत रक्ताची चणचणनागपूर : रक्तसंकलन करणाऱ्या ‘ब्लड मोबाईल व्हॅन’ला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मिळणारे अनुदान थांबल्याने व मेडिकल प्रशासनानेही निधी उपलब्ध करून देण्यास उदासीनता दाखविल्याने डिझेलअभावी ही व्हॅन तब्बल एक वर्षापासून बंद आहे. एकेकाळी रक्तसंकलनातून आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या या व्हॅनला आता इंधनरूपी ‘रक्ता’ची गरज पडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पॅथालॉजी विभागाला नॅको या संस्थेकडून एप्रिल २०१० मध्ये ही ‘व्हॅन’ मिळाली. या व्हॅनची किंमत १.३० कोटी रुपये आहे. सुरुवातीला काही महिने ही ‘व्हॅन’ कर्मचाऱ्यांअभावी सुरूच झाली नाही. आॅगस्ट-२०१० मध्ये चालक, तंत्रज्ञान अशा पाच पदांना मंजुरी मिळाल्यानंतर रक्तसंकलनाला वेग आला. शहरच नाही तर ग्रामीण भागातही रक्तसंकलनाचे कार्य सुरू झाले. एकाच वेळी चार लोक रक्तदान करू शकत असल्याने पहिल्या तीन वर्षी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात यश मिळाले. यातून पुरस्कारही प्राप्त झाला. परंतु नॅकोच्यावतीने ‘व्हॅन’ला लागणारे डिझेल आणि देखभालीसाठी तटपुंजा निधी मिळत असल्याने रक्तसंकलनासाठी ही व्हॅन रस्त्यावर काढणे कठीण झाले होते. चालू वर्षात तर नॅकोकडून अनुदानच उपलब्ध झाले नाही, यामुळे व्हॅन जागेवरच उभी आहे. डॉ. पोवार यांनी निधीच दिला नाहीलोकमतने ‘बंद गाडीला हवे ‘चार्जिंग’या मथळ्याखाली २२ जानेवारी २०१४ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत हा विषय मेडिकलच्या कॉलेज कौन्सिलमध्ये मांडला. यावर चर्चा झाली. सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफेलिया व बीपीएलच्या रुग्णांना मोफत रक्त देणे व इतरांकडून रक्ताच्या प्रतिबॅग १०५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. शुल्क आकारणे सुरू झाले. साधारण ५० हजार रुपयांचा निधीही गोळा झाला. हा निधी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी आपल्या ‘पीएलए’ खात्यात जमा केला. परंतु डिझेल भरण्यासाठी हा निधीच उपलब्ध करून दिला नाही. (प्रतिनिधी)रक्त संकलनावर परिणाममेडिकलच्या रक्तपेढीत स्वत:हून रक्त देणाऱ्या दात्यांची संख्या फारच कमी आहे. दिवसेंदिवस यात घटही होत चालली आहे. यातच वर्षभरापासून व्हॅन बंद पडल्याने विविध शिबिरांमध्ये जाऊन रक्तसंकलन करणेही बंद झाले आहे. परिणामी, रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला आहे. मेडिकलला रोज साधारण ३० ते ५० रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते, परंतु एवढ्या प्रमाणात रक्त मिळत नसल्याची माहिती आहे. उपयोगाअभावी ‘व्हॅन’ होत आहे भंगार १.३० कोटी रुपयांची ही व्हॅन वर्षभरापासून एकाच जागेवर उभी आहे. आणखी काही महिने ही त्याच स्थितीत राहिल्यास त्याचे पार्टस् खराब होऊन भंगाराचे स्वरूप येण्याची शक्यता आहे.
ब्लड मोबाईल व्हॅन वर्षभरापासून बंद
By admin | Updated: November 18, 2014 00:56 IST