लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला काेळसा वाहतुकीचा ट्रक उलटला. त्यात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. ही घटना चिचाळा (ता. भिवापूर) नजीकच्या गरडापार परिसरात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
रंगदेव विश्वकर्मा (रा. सिंदी, मध्य प्रदेश) असे जखमी ट्रकचालकाचे नाव असून, त्यास नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गाेकुल खाण येथील सप्रा कंपनीचा एमएच-४०/बीजी-७१०७ क्रमांकाचा काेळसा भरलेला ट्रक पिरावा खाण येथून उमरेडकडे जात हाेता.
दरम्यान, गरडापार गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला भरधाव ट्रक महामार्गाच्या कडेला उलटला. त्यात केबिनमध्ये फसल्याने ट्रकचालक गंभीररीत्या जखमी झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकास बाहेर काढले व रुग्णवाहिका बाेलावून त्यास उमरेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर मेडिकलला हलविले आहे.
....
ओव्हरलाेड वाहतूक थांबवा
पिरावा खाणीतून काेळशाची ओव्हरलाेड वाहतूक मालेवाडा-उमरेड मार्गे केली जाते. ट्रकमधील काेळसा महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर पडताे. यामुळे अनेकदा दुचाकीस्वाराचे अपघात घडले आहेत, शिवाय काेळशाच्या ओव्हरलाेड वाहतुकीचे ट्रक सुसाट धावतात. यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बेलगाम वाहतुकीवर आळा घालून ओव्हरलाेड वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.