लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनीच कायदा हातात घेण्याच्या घटनांमध्ये आता नवलाई राहिली नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या अॅड. सदानंद नारनवरे यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकिलाने दिवाणी न्यायाधीशांवर हल्ला केला. न्यायाधीशाने मालमत्तेसंदर्भातील दावा खारीज केल्याचा राग मनात ठेवून वकिलाने हे बेकायदेशीर कृत्य केले. या घटनेमुळे विधी क्षेत्रात खळबळ उडाली.अॅड. दीपेश मदनलाल पराते (४५) असे सहायक सरकारी वकिलाचे नाव असून ते गिरीपेठ येथील रहिवासी आहेत. त्यांनी पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण रंगराव देशपांडे (४९) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. जिल्हा न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर देशपांडे यांचे न्यायपीठ आहे. पोलीस तक्रारीनुसार, देशपांडे हे बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास कार्यालयीन कामानिमित्त प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. पी. इंगळे यांना भेटण्यासाठी गेले होते. काम संपल्यानंतर ते व त्यांचे सहकारी न्यायाधीश एस. व्ही. देशमुख हे खाली उतरण्यासाठी सातव्या माळ्यावरील न्यायाधीशांच्या लिफ्टजवळ उभे होते. त्यावेळी आठव्या माळ्यावर असलेल्या पराते यांनी देशपांडे यांच्याकडे रागाने पाहिले. ते पायऱ्या उतरून देशपांडे यांच्याजवळ आले व त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. पराते यांनी देशपांडे यांच्या डाव्या गालावर जोरदार थापड मारली. त्यामुळे देशपांडे यांचा चष्मा खाली पडला. त्यांना भोवळ आल्यासारखे झाले. त्यांनी घाबरून जोरात आरडाओरड केल्यानंतर पराते यांनी त्यांना ठार मारण्याची व पाहून घेण्याची धमकी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरात तैनात पोलिसांनी लगेच धावपळ करून परातेला पकडले. सदर पोलिसांनी न्या. देशपांडे यांच्या तक्रारीवरून पराते यांच्याविरुद्ध कर्तव्यावरील सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा व धमकी देण्याचा गुन्हा नोंदविला आहे.असा होता मालमत्तेचा दावापराते कुटुंबीयांमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे दीपेश यांच्या वडिलांनी चुलत भाऊ विजय व प्रकाश यांच्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. न्या. देशपांडे यांनी तो दावा २८ नोव्हेंबर २०१८ रोजी खारीज केला. त्याचा राग दीपेश पराते यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याची धमकी दिली अशी न्या. देशपांडे यांची तक्रार आहे.न्यायाधीश देशपांडे यांच्यावर गंभीर आरोपअॅड. पराते यांनी सदर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन न्या. देशपांडे यांच्यावर पक्षपाताचा गंभीर आरोप केला. न्या. देशपांडे यांनी दिवाणी दाव्यावर पारदर्शीपणे निर्णय दिला नाही. उलटतपासणीमध्ये साक्षीदारांचे बयान चुकीच्या पद्धतीने नोंदवले. विरोधी पक्षकारांना लाभ मिळेल या पद्धतीने संपूर्ण दावा चालविला. तसेच, त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. त्यामुळे न्या. देशपांडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. न्या. देशपांडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे. परिणामी, आपल्याला सुरक्षा प्रदान करण्यात यावी असे पराते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.एक दिवसाचा पीसीआर मंजूर
सनद रद्द होऊ शकतेया घटनेची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाकडे तक्रार केली गेल्यास व आवश्यक पुरावे सिद्ध झाल्यास अॅड. पराते यांची सनद रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष अॅड. अनिल गोवारदीपे यांनी दिली. कौन्सिल या घटनेची स्वत:हून दखल घेणार नाही. न्यायालय प्रशासनाला आवश्यक पुराव्यांसह कौन्सिलकडे तक्रार दाखल करावी लागेल. त्यानंतर कौन्सिलची समिती त्यावर कायद्यानुसार निर्णय देईल असेही त्यांनी सांगितले.हायकोर्टाने दाखल केली अवमानना याचिका