काँग्रेसचे राजकारण व्होट बँकेचे : देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : भाजपाला नेहमीच जातीयवादी व आरक्षणविरोधी म्हटले जाते. परंतु भाजपा ही नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या आरक्षणाची तरतूद केली होती त्याची मुदत जेव्हा संपली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. सर्वांनी आरक्षण रद्द करण्यासाठी जोर लावला होता. परंतु वाजपेयी यांनी विरोध केला. दलित समाजाला अजूनही आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट करीत ती मुदत वाढवून दिली होती, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंंद्र फडणवीस यांनी येथे केले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाची बैठक रविवारी सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना श्यामकुळे होते. माजी खासदार रामनाथ कोविंद, आ. सुधाकरराव देशमुख, सुधाकर भालेराव, आ. भाई गिरकर, माजी आ. हरीश मोरे, माजी आमदार भोला बढेल, अशोक मेंढे, सुभाष पारधी, राजकुमार बोडोले, रामनाथ नवंदिकर व्यासपीठावर होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ज्या सामाजिक व्यवस्थेत आहोत, त्यात सामाजिक निकष हाच आरक्षण देण्यासाठी योग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी दिलेले सामाजिक निकषाचे सूत्रच योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसचे आजवरचे राजकारण हे व्होट बँकेचे राहिले आहे. दलितांचा वापर त्यांनी केवळ मत मिळविण्यापुरता केला. दलित समाजातील काही स्वार्थी नेत्यांना काँग्रेसने तुकडे दिले. नेत्यांना संधी मिळाली, परंतु समाजाचा फायदा झाला नाही. नेते मोठे झाले, परंतु समाजाचा विकास झाला नाही. मात्र सध्याची तरुण पिढी ही हुशार आहे. त्यांना हे व्होट बँकेचे राजकारण कळाले. त्यांनी भाजपला साथ दिली आणि देशात परिवर्तन घडून आले. हे परिवर्तन आता महाराष्ट्रातही घडवून आणायचे आहे. दलित समाजाने भाजपावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास कायम राखणे हे आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सत्ता हातात आली, की विविध योजनांच्या नावावर भ्रष्टाचार करायचा, असे एकमेव धोरण काँग्रेसचे राहिले आहे. परंतु भाजपाचे तसे नाही. ‘सबका साथ सबका विकास’ हा नरेंद्र मोदींचा नारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक मजबूत राजकीय पार्टी उभारली होती. परंतु काही स्वार्थी नेत्यांनी आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पक्ष कमकुवत केला. त्यांनी सत्तेशी समझोता केला. त्यामुळे समाजापासून दुरावले. त्यामुळे समाजापासून दुरावू नका, समाजात काम करा, नेतृत्व तुम्हाला आपोआप मिळत राहील, असे आवाहनही त्यांनी केले. नाना श्यामकुळे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपविण्याचे काम केल्याची टीका केली. अशोक मेंढे, रामनाथ कोविंद, आ. भाई गिरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गंगाधर कावडे यांनी प्रास्ताविक केले. माजी उपमहापौर संदीप जाधव यांनी संचालन केले. तर धर्मपाल मेश्राम यांनी आभार मानले. केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. परंतु त्यांना तातडीने पत्नागिरीला जायचे असल्याने ते लवकर निघून गेले. (प्रतिनिधी)
भाजपा आरक्षणाच्या बाजूने
By admin | Updated: August 25, 2014 01:18 IST