नागपूर : तिकीट वाटपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. नेत्यांनी दिवसभर नाराजांची समजूत काढण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न केले. बंडखोर व नाराजांची भेट घेण्यासाठी स्थानिक नेत्यांवर जबाबदारीही सोपविण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर धाव घेतली. तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा आरोप आपल्या क्षेत्रातील आमदार व पक्षाच्या नेत्यावर करत काहींनी अश्रूही ढाळले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांवर रोष व्यक्त करीत मोमीनपुरा, हिवरीनगरात निदर्शने केली. मोठ्या प्रमाणात तिकीट कटल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये म्हणून डॅमेज कंट्रोलसाठी शनिवारी सायंकाळी वाड्यावर भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. तीत नाराज कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले. यात प्रामुख्याने उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केलेल्यांचा समावेश होता. नाराजांनी उमेदवारी दाखल केल्याने भाजप नेत्यांची चिंता वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. असंतुष्टांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. यात त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांवर उमेदवारी न दिल्याचा आरोप केला. त्यांनी उमेदवारी नाकारता दिलेली कारणे चुकीची असल्याचे निदर्शनास आणले. काहींनी दुसऱ्या प्रभागातील उदाहरणे दिली. असंतुष्टाची बाजू समजून घेतल्यानंतर गडकरी यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले. पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर काहीही न बोलता कार्यकर्ते घरी परतले. विरोधामुळे चिंता वाढली वाड्यावरील बैठकीतून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे व त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बाहेर पडले. बावनकुळे यांनी पक्षात कुणीही नाराज नसल्याचा दावा केला. बैठकीत निवडणूक प्रचारावर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु असंतुष्ट कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने नेत्यांची चिंता वाढली आहे. असंतुष्टांनी उमेदवारी मागे न घेतल्यास पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे नेत्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणले. यातील अनेक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. प्रभागात त्यांचे चांगले काम आहे.
भाजपाचे मिशन डॅमेज कंट्रोल
By admin | Updated: February 5, 2017 02:05 IST