नागपूर : काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीला संरक्षण दिले. जमीनदारांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी काही जमीन भूमिहीन सामान्य माणसाला मिळवून दिले. दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकार मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून उद्योगपतींना देत आहे. तेही शेतकऱ्यांची संमती न घेता. भाजपने या संबंधीचा भूसंपादन कायदा लोकसभेत बहुमताच्या बळावर मंजूर केला. या विरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करेल, असा इशारा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एका कार्यक्रमासाठी चव्हाण शनिवारी नागपुरात आले. शहर काँग्रेसतर्फे विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले होते. यातील शैक्षणिक आरक्षण देता येईल, असे न्यायालयानेही सुचविले होते. मात्र, त्यानंतरही भाजप सरकारने आरक्षण रोखले. काँग्रेस सरकारने घेतलेले निर्णय, केलेले कायदे रद्द करण्याचे काम आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. जम्मू कश्मिरमधील पीडीपी-भाजप सरकार अतिरेक्यांना सोडते आणि केंद्रातील भाजप सरकार आपल्याला यातील काहीच माहीत नाही, असे सांगते. याला काही अर्थ आहे का, असा सवाल करीत सत्तेसाठी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी देशहिताच्या, संरक्षणाच्या गोष्टी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची हेरगिरी करणे सुरू आहे. राजीव गांधी यांच्या संदर्भातही असाच प्रकार करण्यात आला होता. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, काँग्रेसजन निराश होणारे नसून संपूर्ण काँग्रेस भक्कमपणे नेत्यांच्या पाठीशी उभी राहील.(प्रतिनिधी)
भाजप शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींसाठी घेत आहे
By admin | Updated: March 15, 2015 02:27 IST