लोकमत न्यूज नेटवर्क
तेहट्टा (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील ‘कोरोना’च्या वाढीसाठी बाहेरील राज्यांतून निवडणूक प्रचारासाठी येणारे भाजपचे नेते जबाबदार आहेत. अनेक ‘कोरोना’बाधित नेते व पदाधिकारी तपासणीशिवायच बंगालमध्ये येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लावला आहे.
. भाजपाचे अनेक पदाधिकारी ‘कोरोना’ग्रस्त असूनदेखील बंगालमध्ये प्रचारासाठी येत आहेत. भाजपच्या बेजबाबदारीमुळे ‘कोरोना’बाधितांमध्ये वाढ झाली आहे. हावडा येथील भाजपचे एक उमेदवार बाधित असल्यानंतरदेखील प्रचारासाठी निघाले, असे ममता यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने अगोदर मला पूर्ण दिवस प्रचार करण्यापासून रोखले. आता अंतिम तीन टप्प्यांचा प्रचार चार दिवसांनी कमी केला. त्यामुळे दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांत २० सभांना संबोधित करू शकणार नाही. निवडणूक प्रचारात पाच दिवसांची घट करण्यासाठी निवडणूक आयोगच जबाबदार आहे. ‘कोरोना’ची स्थिती पाहता अखेरच्या तीन टप्प्यांतील निवडणुका एकत्रित घेण्याची विनंती आयोगाने नामंजूर केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा
देशातील कोरोनाच्या एकूण वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. दुसऱ्या लाटेसंदर्भात मोदींना नियोजन करता आले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची प्रतिमा चांगली करण्यासाठी त्यांनी बाहेरील देशांना लसी पुरविल्या. महाराष्ट्रासारख्या राज्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. तेथे मदत पोहोचविण्याऐवजी मोदी बंगालमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. मोदींना यासंदर्भात कडक भाषेत पत्र लिहिणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.