गडकरी-फडणवीस यांना अधिकार : कोअर कमिटीचा पर्यवेक्षकांसमोर निर्णय नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह विधान परिषद उमेदवार निवडीवर दीड तास चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी शहर व जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उपस्थित नेत्यांनी उमेदवारीसाठी कुणाचेही नाव उघडपणे सुचविणे टाळत गडकरी- फडणवीस हे दोन्ही नेते घेतील तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका पर्यवेक्षक म्हणून आलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी- फडणवीस यांच्या चर्चेत उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बराच वेळ असल्यामुळे सध्या नाव गुलदस्त्यात ठेवण्यात येत आहे. गडकरी- फडणवीस यांच्या चर्चेनंतर रविवारी दिवसभर भाजप वर्तुळात उमेदवाराच्या नावावरून खलबते सुरू होती. सकाळपासूनच कुणी महापौर प्रवीण दटके यांचे नाव फायनल झाल्याचा दावा करीत होते तर कुणी मागील निवडणुकीतील उमेदवार माजी आ. अशोक मानकर यांना होकार मिळाल्याचे सांगत होते. ऐनवेळी गिरीश व्यास किंवा रमेश मानकर यांचे नाव समोर येईल, असा दावा करणारेही होते. शहरातील उमेदवार योग्य राहील की ग्रामीणमधील अशीही तुलना सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर कोअर कमिटीची बैठक दुपारी ३.३० वाजता बोलाविण्यात आल्याचे निरोप पदाधिकाऱ्यांना आले. बैठकीत पर्यवेक्षक म्हणून वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी जाणून घेतली मतेमुनगंटीवार यांनी उमेदवार निवडीबाबत आपले मत मांडण्याचे आवाहन उपस्थितांना केले. मात्र, सर्वांनीच उघडपणे उमेदवाराचे नाव सुचविणे टाळले. शेवटी आ. कृष्णा खोपडे व डॉ. राजीव पोतदार या दोन्ही अध्यक्षांनी गडकरी व फडणवीस घेतील तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका मांडली. आता मुनगंटीवार कोअर कमिटीचा निर्णय संबंधित दोन्ही नेत्यांना कळवतील. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवाराच्या घोषणेबाबत विचारले असता त्यांनी थोडी वाट पहावी लागेल, असे सूचक उत्तर दिले.