सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : मतदारांनी कामठी तालुक्यातील नऊपैकी सहा ग्रामपंचायती भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीच्या झाेळीत टाकल्या असून, दाेन ग्रामपंचायती काॅंग्रेस समर्थित गटाच्या वाट्याला गेल्या आहेत. महालगाव येथील मतदारांनी संमिश्र काैल दिला आहे. तालुक्यातील एकूण ५७ जागांवर आदर्श ग्रामविकास आघाडी, २६ जागांवर काॅंग्रेस समर्थित आघाडी, तर तीन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.
मतदारांनी कामठी तालुक्यातील काेराडी, लाेणखैरी, पावनगाव, घाेरपड, भामेवाडा व खेडी या सहा ग्रामपंचायती भाजप समर्थित आघाडीच्या झाेळीत टाकल्या असून, केसाेरी व टेमसना या दाेन ग्रामपंचायती काॅंग्रेस समर्थित आघाडीच्या वाट्याला गेल्या आहेत. महालगाव येथे काॅंग्रेस समर्थित आघाडीला भरीव यश मिळाले आहे. काेराडी येथील वाॅर्ड क्रमांक-१ मधून काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांचे बंधू राजेश कंभाले यांनी भाजप समर्थित आघाडीच्या उमेश निमाेणे यांचा १६९ मतांनी पराभव केला.
लाेणखैरी येथे नऊपैकी सहा जागा भाजप समर्थित आघाडीने जिंकल्या असून, माजी सरपंच लीलाधर भाेयर यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. येथे महाविकास आघाडी समर्थित गटाला धक्का बसला आहे. घाेरपड व पावनगाव येथे भाजप समर्थित आघाडीने नऊही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. या दाेन्ही ग्रामपंचायतीमध्ये काॅंग्रेस समर्थित आघाडीला खातेही उघडता आले नाही. खेडी येथे नऊपैकी आठ जागा भाजप समर्थित आघाडीने जिंकल्या असून, एक जागा काॅंग्रेस समर्थित आघाडीला मिळाली आहे.
टेमसना येथे नऊपैकी सहा जागा जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुरुषाेत्तम शहाणे यांच्या गटाने जिंकल्या असून, माजी सरपंच मनाेहर काेरडे यांच्या गटाला तीन जागांवर विजय मिळाला आहे. येथे भाजप समर्थित आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. ही ग्रामपंचायत ५० वर्षांपासून काॅंग्रेस समर्थित गटाकडेच आहे. येथे शहाणे कुटुंबातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आमन-सामने हाेते. यात अनिकेत शहाणे यांनी बाजी मारली. केसाेरी येथील सातपैकी सातही जागा काॅंग्रेस समर्थित महाविकास आघाडीने जिंकल्या. येथे भाजप समर्थित आघाडीला खाते उघडणे शक्य झाले नाही. भामेवाडा येथे सातपैकी सातही जागा भाजप समर्थित आघाडीने जिंकल्या असून, काॅंग्रेस समर्थित आघाडीला एकही जागा मिळाली नाही. या ग्रामपंचायतवर पूर्वी काॅंग्रेस गटाची सत्ता हाेती.
...
काेराडी ग्रामपंचायत भाजप गटाकडेच
काेराडी हे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मूळ गाव हाेय. भाजप समर्थित गटाने ही ग्रामपंचायत पाचव्यांदा स्वत:कडे कायम राखण्यात यावेळी यश मिळविले आहे. या ग्रामपंचायतवर भाजप समर्थित गटाचे १२ उमेदवार निवडून आले असून, पाच जागा काॅंग्रेस समर्थित आघाडीने जिंकल्या आहेत.
...
अनिल निधान यांना धक्का
महालगाव हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांचे मूळ गाव असून, येथे ११ पैकी काॅंग्रेस समर्थित आघाडीला चार व भाजप समर्थित आघाडीला तीन जागा मिळाल्या असून, तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. त्यामुळे मतदारांनी अनिल निधान यांना धक्का दिला आहे. परंतु, अनिल निधान यांचे बंधू भगवान निधान विजयी झाले आहेत. येथील प्रवीण धांडे या उमेदवाराने आत्महत्या केल्याने एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली. प्रवीण धांडे हे काॅंग्रेस समर्थित आघाडीचे उमेदवार हाेते.
...
सासू, सून पराभूत
भामेवाडा येथे मावळत्या सरपंच कविता बांगडे या वाॅर्ड क्रमांक-३ मधून, तर त्यांची सून शिल्पा बांगडे या वाॅर्ड क्रमांक-२ मधून निवडणूक रिंगणात उतरल्या हाेत्या. विशेष म्हणजे मतदारांनी दाेघांनाही नाकारले. काॅंग्रेस व भाजपकडे तालुक्यातील प्रत्येकी दाेन जिल्हा परिषद आणि प्रत्येकी चार पंचायत समिती सर्कल आहेत. बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांना मतदारांनी धक्के दिले आहेत.