नागपूर : सर्व्हिस रायफलीतून गोळी झाडून मित्राची हत्या करणाऱ्या एका आरपीएफ जवानाची आजन्म कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. व्ही. एन. देशपांडे यांच्या खंडपीठाने सहा वर्षांच्या कारावासात परिवर्तित केली. मनोज सिसोदिया, असे आरोपीचे नाव आहे. मलखानसिंग बघेल, असे मृताचे नाव होते. या प्रकरणाची हकीकत अशी, हत्येची ही घटना २० मे २०१० रोजी पाचपावली पोलीस ठाण्याच्या मेकोसाबाग भागात घडली होती. मनोज आणि मलखानसिंग हे दोघेही आरपीएफचे जवान होते. मेकोसाबाग येथे रक्षक म्हणून ते तैनात असायचे. घटनेच्या दोन-तीन महिन्यापूर्वी मनोजचा विवाह झाला होता. मलखानसिंग आणि मनोज मित्र होते. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. मलखानसिंगची नजर मात्र मनोजच्या पत्नीवर होती. घटनेच्या दिवशी मनोज हा आपल्या कर्तव्यावर तैनात असताना मलखानसिंग याने त्याची मोटरसायकल मागितली होती. मोटरसायकल घेऊन गेल्यानंतर तो कोठे तरी दारू प्याला होता. त्यानंतर तो नशेत मनोजच्या घरी गेला होता. त्याने मनोजच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला होता आणि घडलेली घटना फोनवर आपल्या पतीला सांगितली होती. परिणामी मनोज संतप्त झाला होता. तो घराकडे जात असतानाच मलखानसिंग त्याला रस्त्यातच भेटला होता. रागाच्या भरात मनोजने रायफलीतून एक गोळी मलखानसिंगच्या छातीवर झाडली होती. त्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने मनोजला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अपील दाखल करून मनोजने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन केले. मित्राने केलेला विश्वासघात त्याला सहन झाला नाही. त्याने एकच गोळी मारली होती. न्यायालयाने या गोष्टी विचारात घेऊन आरोपी मनोजची जन्मठेप सहा वर्षांच्या शिक्षेत परिवर्तित केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. अनिरुद्ध जलतारे तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील ठाकरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
जन्मठेप सहा वर्षांत परिवर्तित
By admin | Updated: October 11, 2014 02:54 IST