योगेंद्र शंभरकर
नागपूर : अंबाझरी जैवविविधता पार्क विविध प्रजातींच्या पक्ष्यांकरिता प्रसिद्ध आहे. परंतु, सध्या अशांत वातावरणामुळे पार्कमधील पक्षी अदृश्य झाले आहेत. परिणामी, बर्डस् वॉचरनी पार्ककडे पाठ फिरविली आहे.
दरवर्षी देश-विदेशांतील असंख्य पक्षी स्थलांतरीत होऊन अंबाझरी पार्कमध्ये येतात. त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले आपोआप अंबाझरी पार्ककडे वळतात. अंबाझरी बॅक वॉटरक्षेत्रात पक्ष्यांचा अधिवास असतो. पक्षीप्रेमींनी गेल्या काही वर्षांत या परिसरात २८० वर प्रजातींच्या पक्ष्यांची उपस्थिती नोंदवली आहे. या परिसरात राष्ट्रीय पक्षी मोरही मोठ्या संख्येत दिसून येतात. ही बाब लक्षात घेता वन विभागाने दोन वर्षांपूर्वी अंबाझरी तलावालगतच्या ७५० हेक्टर क्षेत्राला जैवविविधता उद्यानामध्ये परिवर्तित केले. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांना शहराजवळच वन भ्रमणाकरिता चांगली जागा उपलब्ध झाली. या क्षेत्रात वाडी, पांढराबोडी व एमआयडीसी येथून प्रवेश दिला जातो. परिणामी, पार्कमधील शांती भंग पावली आहे. पार्कमध्ये संपूर्ण दिवस फिरता येत असल्याने गोंधळ वाढला आहे. युवकांचे समूह पक्षांच्या अधिवासाजवळ आरडाओरड करतात. परिणामी, पक्षी दुसरीकडे उडून जातात.
-----------
पक्षी दुसऱ्या तलावांकडे वळले
अंबाझरी पार्कमध्ये गेल्या १० वर्षांपासून पक्षांचे छायाचित्रण करत असलेले राजेश गाडगे यांच्या माहितीनुसार, नागरिकांच्या आरडाओरड्यामुळे पक्षी अदृश्य झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षी दिसून येत नाही. आता गोरेवाडा व झिलपी तलाव परिसरात जास्त पक्षी आढळून येत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
------------
काही क्षेत्रांत प्रवेश बंदी हवी
पक्षीप्रेमी व्यंकटेश मुदलियार यांच्यानुसार, अंबाझरी पार्कमध्ये युवक-युवतींची संख्या वाढली आहे. पक्षी अधिवास परिसरात नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई केली गेली पाहिजे. आवाज वाढल्यामुळे पक्षी पार्कमधून निघून गेले आहेत. परिणामी, बर्डस् वॉचरनीही पार्ककडे पाठ फिरविली आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
--------------
अभ्यास करून उपाय करू
अंबाझरी पार्कची निर्मिती पर्यावरणप्रेमी नागरिकांसाठी करण्यात आली आहे. पार्कमधील पक्षी कमी होत असल्यास त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी पक्षीतज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल. समितीच्या अहवालानंतर आवश्यक उपाय केले जातील.
-----
डॉ. प्रभूनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक.