लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक पाणथळ दिवसाचे औचित्य साधून वनविकास महामंडळज, वनविभाग व दि हेरिटेज कंझर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेवाडा बायोपार्क व बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय येथे पक्षीनिरीक्षण करून वनविभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पक्षीप्रेमींना मार्गदर्शन केले.
आपल्या भागातील नैसर्गिक पाणथळीसमोर असलेले संकट, संवर्धनासाठी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. आपल्याकडे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांवर असलेल्या संकटाची जाणिव करून दिली.
गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई म्हणाले की, वनविभाग, सामाजिक संस्था व निसर्गप्रेमी यांनी आज खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. निसर्गप्रेमी व संस्थांनी या कामात आपले योगदान देणे सुरू केले आहे. सगळ्यांनी सोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंद हाते, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक विनीत अरोरा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहायक वनसंरक्षक विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे, आर.पी. भिवगडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल यांनी स्थलांतरित पक्ष्यांमुळे येणाऱ्या संसर्गजन्य रोगांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वनपाल वलथरे, सुखदेव राऊत, वनरक्षक युवराज राठोड, हरीश किनकर, सौरभ सुखदेवे, श्रीरंग कुलकर्णी, आरती भाकरे, शुभम मेश्राम, ऐश्वर्या वाघ, हर्ष दातरकर, राजेंद्र जैन तसेच हिस्लॉप कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.