नागपूर : कोरोना महामारीतून लोक अजूनही बाहेर पडले नाहीत तर दुसरीकडे बर्ड फ्लूसारख्या घातक विषाणूने लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हजारो पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्यप्रेमी अंडी आणि चिकनपासून दूर जात आहेत. त्याचा फटका नागपुरातील ३५० पेक्षा जास्त सावजी व्यावसायिकांना बसला असून त्यांच्या दररोजच्या लाखो रुपयांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी सावजी हॉटेलकडे जाणेच बंद केल्याचे काही शौकिनांनी सांगितले. आवडत्या व्यंजनापासून अंतर ठेवावे लागत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनमध्ये जवळपास ५ महिने बंद असलेला हा व्यवसाय आता कुठे चांगला सुरू झाला होता. पण घातक विषाणूमुळे या व्यवसायावर संकट आले आहे. बर्ड फ्लूमुळे अंड्याच्या व्यवसायातही घसरण झाली आहे. ४८० रुपये शेकड्याचे भाव १०० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहेत. काही किराणा दुकानदारांनी विक्री बंद केली आहे. याशिवाय सायंकाळी शहरातील अनेक फूटपाथवर लागणाऱ्या अंड्याच्या ठेल्यांवर आता ग्राहक जात नसल्याने अनेकांनी काही दिवसांसाठी व्यवसाय बंद केल्याची माहिती आहे. या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्यांना आता आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सावजी व्यावसायिकांनी काही खाद्यान्नाचे दर कमी केल्यानंतरही ग्राहक येत नसल्याची त्यांची तक्रार आहे. बर्ड फ्लूचा परिणाम किती दिवस राहील, हे सांगणे कठीण आहे. पण या व्यवसायाशी जुळलेल्या शेकडो लोकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचे मत व्यावसायिक प्रवीण खापरे यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे पनीर, मशरूम आणि सोयाबीन वड्यांची मागणी वाढली आहे. खाद्यप्रेमी आता शाकाहारी व्यंजनावर भर देत आहेत.
पोल्ट्री फार्म खाद्याचे दर उतरले
बर्ड फ्लूचा परिणाम आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायाला लागणारे खाद्य सोयाबीन डीऑईल केक ३६ रुपयांवरून २६ रुपये आणि मक्याचे दर १८ रुपयांवरून १० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि डीऑईल केकची निर्मिती करणाऱ्यांना बसत आहे. या दोन्ही खाद्यांना भाव मिळत नसल्याने तोट्यात माल विकण्याऐवजी विक्रेते साठा करीत आहेत.