नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानाला बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान झाले आहे. आगीमुळे २०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. त्यामुळे परिसरात अधिवास असलेले सर्प तसेच सरपटणारे चिमुकले प्राणी, पक्ष्यांचे घरटे व पिलेही जळाले. वनविभागाचे अधिकारी आग लागण्यामागे जबाबदार असलेल्या तत्त्वांचा शाेध घेत आहेत.
जैवविविधता उद्यानाच्या मागील भागाला लागून विद्यापीठाचा परिसर आहे. विद्यापीठ प्रशासनाने या परिसराच्या साफसफाईचे काम कंत्राटदाराला दिले हाेते. बुधवारी या कामादरम्यान कचरासुद्धा जाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान आगीची ठिणगी जैवविविधता उद्यानात गेली आणि उद्यानातील सुकलेल्या गवताने पेट घेतला. गवतामुळे ही आग सर्वत्र वेगाने पसरली आणि काही वेळात विक्राळ रूप धारण केले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या आग विझविण्यासाठी पाेहचल्या. अशात वन कर्मचारीही वृक्षांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसले. दुपारी लागलेली आग सायंकाळी ७ वाजतापर्यंत नियंत्रणात येऊ शकली. गुरुवारी जीपीएसद्वारे पाहणी केली असता २०० हेक्टरचे जंगल प्रभावित झाल्याची बाब लक्षात आली.
साक्षी नाेंदविल्या जात आहेत
वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी सांगितले, विद्यापीठ परिसरात लावण्यात आलेल्या आगीमुळेच जैवविविधता उद्यानात आग लागल्याचे प्राथमिक तपासादरम्यान दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठ क्षेत्रातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची विचारपूस करून साक्षी नाेंदविल्या जात आहेत. चाैकशीनंतर पुढे जबाबदार लाेकांवर गुन्हे दाखल केले जातील.