लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना.. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले हे केवळ एक गीत नव्हे तर ती बाबासाहेबांना अर्पण केलेली अनुयायांची भावना होय. त्यातील प्रत्येक शब्द हा हृदयातून बाहेर पडतो. त्यामुळेच हे गीत गाताना कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा कंठ दाटून येतो. डोळे पाणावतात. अशीच काहीसी अवस्था आज देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांची झाली. त्यांनी या अजरामर गीताच्या निर्मितीची कहानी सांगत संपूर्ण गीत सादर केले. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. डोळे पाणावले. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होता.
निमित्त होते. दीक्षाभूमीतील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाचे. शनिवारी हा कार्यक्रम दीक्षाभूमीतील डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडला. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे दीक्षाभूमीशी अतुट असे नातं आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमात केवळ एक पाहुणे म्हणून सहभागी झाले नव्हते. तसे त्यांनी आपल्या भाषणातही सांगतिले. यावेळी सरन्यायाधीशांनी अनेक जुन्या घटनांना उजाळा दिला. यातीलच एक घटना म्हणजे भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना या अजरामर गीताच्या निर्मीतीची होय. सरन्यायाधीश म्हणाले मी तेव्हा बी.काॅम.ला शिकत होतो. दीक्षाभूमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माझे वडील रा.सू. गवई यांनी कविवर्य सुरेश भट यांना एक भीम वंदना लिहिण्याची विनंती केली. यासाठी सुरेश भट हे त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी महिनाभर थांबले होते. या महिनाभरात त्यांची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या महिनाभरात सुरेश भट यांनी जे गीत तयार केले ते अजरामर झाले. ते गीत होते. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना.. या अजरामर गीताच्या निर्मितीचा मी साक्षीदार होऊ शकलो,असे सांगत त्यांनी संपूर्ण गीत सादर केले. यावेळी गीत गाताना त्यांचा कंठ सुद्धा दाटून आला होता. त्यांचे डोळेही पाणावले होते. यावेळी सभागृहात अनेक न्यायाधीश, वकील, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील म्नायवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. सरन्यायाधीश न्या. गवई यांनी या अजरामर गीतांच्या निर्मीतीची सांगितलेली कहानी आणि गायलेले गीत दीक्षाभूमीच्या इतिहासात एक खास भावनिक पान ठरले.