नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख व सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू दादा.जे.पी.वासवानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. लोकसभा निवडणुकांमध्ये संघाने पार पाडलेली सक्रिय भूमिका व त्यानंतर भाजपाला मिळालेले एकहाती यश यामुळे यंदाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान सरसंघचालक काय संदेश देतात याकडे स्वयंसेवकांसोबतच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दादा वासवानी यांचे भक्त जगभरात पसरलेले आहेत. ९६ वर्षाच्या वयात दादा वासवानी सामाजिक कार्यात अजूनही सक्रिय आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे ते प्रत्यक्ष जरी या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्या आशीर्वचनांचे वाचन करण्यात येईल असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विजयदशमी उत्सवाअगोदर स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे, अशी माहिती महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता व महानगर सहसंघचालक लक्ष्मणराव पार्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)स्वयंसेवकांमध्ये उत्साहदेशात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या विजयादशमी उत्सवासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरूनदेखील स्वयंसेवक येणार आहेत.पथसंचलनाचा मार्गरेशीमबाग चौक येथून सकाळी ६.१५ वाजता पथसंचलनाला सुरुवात होईल. सी.पी.अॅन्ड बेरार महाविद्यालयापासून पथसंचलन दोन पथकांत विभागले जाईल. पहिले पथक भुतिया दरवाजा चौक, दसरा रोड, राहतेकर वाडी, नागनदी पूल मार्गे रेशीमबाग चौक येथे पोहोचेल तर दुसरे पथक सोनबाची वाडी चौक, नागनदी पूल, जामदार हायस्कूल मार्गे रेशीमबाग चौक येथे पोहोचेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या सोहळ्याचे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. व्हीएसके नागपूर. ओआरजी’ या संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भीम माझा सूर्याची सावली!
By admin | Updated: October 3, 2014 02:47 IST