राष्ट्रपतींच्या जेवणात भेंडी व मूग डाळ : राजभवनातील मेन्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:41 AM2019-08-18T00:41:21+5:302019-08-18T00:42:53+5:30

देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा साधेपणा सर्वश्रुत आहे आणि शनिवारी राजभवनच्या कर्मचाऱ्यांनीही तो अनुभवला. एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी काही काळ राजभवनात घालविला. यावेळी त्यांनी भोजन घेतले. यामध्ये पालक पनीर, भेंडी आणि मूग डाळ असे शाकाहारी साधे जेवण होते.

Bhendi and moong dal at the President's Dinner: A menu at the Raj bhavan | राष्ट्रपतींच्या जेवणात भेंडी व मूग डाळ : राजभवनातील मेन्यू

राष्ट्रपतींच्या जेवणात भेंडी व मूग डाळ : राजभवनातील मेन्यू

Next
ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या कुटुंबासह राज्यपाल व गडकरी यांचीही उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा साधेपणा सर्वश्रुत आहे आणि शनिवारी राजभवनच्या कर्मचाऱ्यांनीही तो अनुभवला. एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी काही काळ राजभवनात घालविला. यावेळी त्यांनी भोजन घेतले. यामध्ये पालक पनीर, भेंडी आणि मूग डाळ असे शाकाहारी साधे जेवण होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय तसेच राज्यपाल के. विद्यासागर राव व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही स्नेहभोजन केले.
शनिवारी सेवाग्राम, वर्धा येथील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती नागपूरला आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुसेनेच्या विशेष विमानाने आलेल्या राष्ट्रपती कोविंद यांचे राज्यपाल के. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर ते थेट सेवाग्राम येथे रवाना झाले. सेवाग्राम येथील कार्यक्रम आटोपून ते दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी सदरच्या राजभवनात पोहचले. यावेळी त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या आगमनानिमित्त खास त्यांना आवडणारे शाकाहारी जेवण बनविण्यात आले होते. यामध्ये मिक्स व्हेजिटेबल सूप, कॉर्न कटलेट्स, टोमॅटो सॉस, ग्रीन सलाद यासह पालक पनीर, भेंडीची भाजी, मूग डाळ, दही, भात, फुलक्या पोळ्या, फिन्सी स्वीट व फळांचा समावेश होता. दुपारी २ वाजताच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद व कुटुंबीयांसह राज्यपाल के. विद्यासागर राव आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोबत स्नेहभोजन केले. यावेळी राष्ट्रपती व त्यांच्या कुटुंबीयांनी भोजनाचे कौतुक केले.
राजभवनाचे अधिकारी रमेश येवले यांनी सांगितले, राष्ट्रपती यांच्या भोजनाचा मेन्यू आधीच ठरलेला असतो. रामनाथ कोविंद यांची ही दुसरी भेट असल्याने आम्हाला त्यांच्या आवडीनिवडीबाबत थोडी माहिती होती. त्यानुसार हा मेन्यू तयार करण्यात आला व तो मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनाकडे पाठविण्यात येतो. राष्ट्रपती भवनातील शेफकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याशी समन्वय साधून शनिवारी त्यांच्या आवडीनुसार भोजन तयार करण्यात आल्याचे येवले यांनी स्पष्ट केले. भोजनानंतर त्यांनी काही वेळ आराम केला. निघताना त्यांनी राजभवनच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सुंदर भोजन व सरबराईसाठी सर्वांचे आभारही मानले. यानंतर दुपारी ४ वाजता राजभवनमधून विमानतळाकडे रवाना झाल्याचे रमेश येवले यांनी सांगितले.
साधेपणाने राजभवनही भारावले
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नागपूरच्या राजभवनला ही दुसरी भेट होती. त्यांच्या साधेपणासाठी जसे ते प्रसिद्ध आहेत तसे मृदुभाषी म्हणूनही ते ओळखले जातात. राजभवनात आल्यावर राजभवन अधिकारी रमेश येवले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिवादन स्वीकारले. बोलताना स्पष्ट भाषा व त्यांच्यातील ऊर्जा स्पष्ट जाणवत होती. कर्मचाऱ्यांशी त्यांचा संवाद जुना परिचय असल्यासारखा होता. सर्वांची आस्थेने विचारपूस केली आणि बोलताना त्यांच्या मुखावरील निरागस हास्य सर्वांना आकर्षित करीत होते. जेवढा वेळ थांबले तेवढा वेळ हसतमुखानेच त्यांनी संवाद साधला. देशाच्या सर्वोच्च पदावर असण्याचा कुठलाही आव त्यात नव्हता. निघतानाही त्यांनी स्वागत, सरबराई व सुग्रास भोजनासाठी शेफ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ‘सबको मेरा धन्यवाद’, असे म्हणत ते राजभवनातून रवाना झाले. त्यांची ही ऊर्जा आणि साधेपणा पाहून राजभवनमधील सर्व कर्मचारीही भारावून गेले.
उद्यान व राजभवन परिसराचे भरभरून कौतुक
अडीच तासांच्या मुक्कामादरम्यान राष्ट्रपती व त्यांच्या कुटुंबीयांनी राजभवनचे उद्यान व या परिसराचे भरभरून कौतुक केले. रामनाथ कोविंद यांची ही दुसरी भेट होय. पहिल्या भेटीच्या वेळी त्यांचा मुलगा सोबत होता. मात्र यावेळी पत्नी आणि मुलगी पहिल्यांदा राजभवनला आले होते. येथील परिसराचे सौंदर्य पाहून तेही अभिभूत झाले. हा वारसा इतक्या सुंदर पद्धतीने जोपासल्याबद्दल राष्ट्रपती यांनी राजभवन अधिकारी रमेश येवले यांची अनेकदा प्रशंसा केली. इतर ठिकाणापेक्षा नागपूरचे राजभवन अप्रतिम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीयांनीही राजभवनच्या सौंदर्याची प्रशंसा केली.
आपही के घर मे आपका स्वागत
राजभवन येथील भेटीदरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हसतमुख स्वभावही दिसून आला. राजभवन हे राज्यपालांचे निवासस्थान असते. त्यानुसार येथे येणाऱ्या राष्ट्रपतींसारख्या पाहुण्यांचे स्वागत राज्यपाल करीत असतात. परंतू शनिवारी कुटुंबासह असलेल्याराष्ट्रपतींनी राज्यपाल के. विद्यासागर राव यांचे स्वागत केले. ‘आपही के घर मे आपका स्वागत है...’ असे म्हणत त्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी येथे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. नागपूरकर असलेले नितीन गडकरी यांच्याशीही त्यांनी हसतमुख संवाद साधला.


महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद कुटुंबासह शनिवारी राजभवन येथे पोहचले. यावेळी उपस्थित राज्यपाल के. विद्यासागर राव आणि स्वागत करताना राजभवन अधिकारी रमेश येवले व इतर.

Web Title: Bhendi and moong dal at the President's Dinner: A menu at the Raj bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.