नगरधन : भरधाव माेटरसायकल विरुद्ध दिशेने येणाऱ्या बैलगाडीवर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतलवाडी-रामटेक मार्गावर साेमवारी (दि. २२) रात्री ७.२० वाजताच्या सुमारास घडली.
उदाराम शिवराम उके (५३, रा. नगरधन, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. ते कांद्री माईन येथे नाेकरी करीत असल्याने साेमवारी रात्री काम आटाेपल्यानंतर एमएच-४०/जी-४००३ क्रमांकाच्या माेटरसायकलने कांद्री येथून नगरधनला येत हाेते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणारी बैलगाडी मध्येच थांबल्याने त्यांची माेटरसायकल त्या बैलगाडीवर आदळली. यात त्यांच्या छाती व डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक शेंडगे करीत आहेत.