लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : प्रवासी काटाेलच्या दिशेने जात असलेल्या बसला विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या पिकअपने जाेरात धडक दिली. यात पिकअपचालक गंभीर जखमी झाला असून, काही प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नरखेड-सावरगाव-काटाेल मार्गावरील पिंपळगाव (वखाजी) परिसरात रविवारी (दि. १०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रवीण मोरघडे, रा. वर्धा असे गंभीर जखमी पिकअप चालकाचे नाव आहे. काटाेल आगाराची एमएच-४०/८४९४ क्रमांकाची बस ३० प्रवासी घेऊन नरखेडहून काटाेलच्या दिशेने निघाली हाेती. ती बस पिंपळगाव (वखाजी) शिवारात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने अर्थत सावरगावहून नरखेडकडे वेगात येणाऱ्या एमएच-३२/क्यू-६२८७ क्रमांकाच्या पिकअपने बसला जाेरात धडक दिली. यात बसमधील काही प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली तर पिकअपचालक प्रवीण माेरघडे गंभीर जखमी झाला.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्व जखमींना नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे सर्वांवर प्रथमाेपचार करण्यात आले. बसमधील प्रवाशांना उपचारानंतर सुटी देण्यात आली तर प्रवीणला उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. याप्रकरणी बसचालक नरेश किसना नाखले यांच्या तक्रारीवरून नरखेड पाेलिसांनी प्रवीण मोरघडेविरुद्ध भादंवि २७९, ३३६, ३३८, ४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार प्रकाश खाेपे करीत आहेत.