लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमधील घटनानागपूर : जवळ तिकीट नसताना गाडीतील टीसीला आपण टीसी असल्याचे सांगून अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये एका नकली टीसीने एसी कोचमध्ये बर्थ मिळविला. थोड्या वेळाने या गाडीतील टीसीला शंका आल्याने त्यांनी या नकली टीसीला ओळखपत्र मागितले असता त्याचे खरे रूप कळले. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर गाडीतील टीसीने या नकली टीसीला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.रेल्वेगाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचली. अकोला स्थानकावर पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेला सचिन आनंद सोनवणे हा एसी कोचमध्ये चढला. अकोल्यावरून गाडी सुटल्यानंतर गाडीतील टीसी रॉबर्ट अंथोनी आणि दुसऱ्या टीसीला भुक लागल्यामुळे ते पेंट्रीकारकडे जात होते. तेवढ्यात सचिन सोनवणे हा त्यांच्या मागे गेला. त्याने आपण ‘स्टाफ’ आहोत अशी बतावणी केली. टीसी असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी ए-२ कोचमधील ३२ क्रमांकाचा बर्थ त्यास दिला. थोड्या वेळानंतर टीसी पुन्हा कोचमध्ये आले असता त्यांना या नकली टीसीवर शंका आली. त्यांनी त्याला ओळखपत्र मागितले असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हा नकली टीसी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर रॉबर्ट अंथोनी या टीसीने या नकली टीसीला पकडून सायंकाळी ६ वाजता लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी या नकली टीसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
टीसी असल्याचे सांगून मिळविला एसी कोचमधील बर्थ
By admin | Updated: May 25, 2015 02:43 IST