नागपूर : जोरदार पाऊस सुरू असताना एका इंडिका कारने अचानक पेट घेतल्याने रामदासपेठेत चांगलीच खळबळ उडाली. कार मालकांनी प्रसंगावधान राखत लगेच बाहेर धाव घेतल्याने अनुचित घटना टळली. आज दुपारी ३.४५ च्या सुमारास ही घटना घडली. एमएच ३१/ सीएन ६४७७ क्रमांकाची इंडिका कार अलंकार चौकातून काछीपुरा चौकाकडे जात होती. पीपल्स जीमसमोर कार येताच बोनटमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे कार मालकांनी रस्त्याच्या बाजूला कार लावली. त्यांनी बोनट उघडताच आगीचा लोळ वर आला. ते पाहून कार मालकांनी बाजूला धाव घेतली. पाऊस सुरू असताना कार पेटल्याचे दृश्य आश्चर्याचा विषय होते. काही तरुणांनी रस्त्यावरील साचलेले पाणी मारून आग विझविण्याचे प्रयत्न केले. एकाने बाजूच्या कार्यालयातून अग्निशमन उपकरणही आणले. आगीमुळे स्फोट होतो की काय, अशी भीती निर्माण झाली असतानाच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाच मिनिटातच कारची आग विझविली. कारचे किती नुकसान झाले ते स्पष्ट झाले नाही. (प्रतिनिधी)
भरपावसात पेटली इंडिका
By admin | Updated: July 23, 2014 00:57 IST