दिवस-रात्र सुरू असते तळीरामांची मैफिल : तरुणी, महिलांसह, ज्येष्ठ नागरिक त्रस्त सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर नागपूर शहरातील बीअर शॉपी चालकांना बीअर विकण्याचा परवाना आहे. परंतु अनेकांनी दुकानाबाहेर शेड तयार करून तेथेच मद्यप्राशन करण्यास परवानगी दिली आहे. उघड्यावर दारू, बीअर पिणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कारवाई होत नाही. परिणामी, शहरातील बहुसंख्य बीअर शॉपीच्या बाहेर जणू बीअर पिणाऱ्यांची स्पर्धा असल्यासारखीच गर्दी असते. विशेष म्हणजे, यातील अनेक बीअर शॉपीला परवानगी नाही. परंतु भीतीपोटी कुणीच काही बोलत नाही. पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने यांचे फावत आहे. मात्र, तेथील रहिवाशांना, परिसरातील नागरिकांना विशेषत: तरुणी, महिलांना या मद्यपींना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. बहुसंख्य बीअर शॉपी या फ्लॅट स्कीम व अपार्टमेंटमध्ये आहे. यामुळे कोवळ्या वयाची मुले दारूच्या विळख्यात सापडत असल्याचे वास्तव आहे. महामार्गावरील वाईन शॉप, बीअर बार बंद करण्यात आल्याने अनेकांनी आपला मोर्चा बीअर शॉपींकडे वळविला आहे. ‘लोकमत’ चमूने काही दिवसांपासून शहरातील बीअर शॉपीवर नजर ठेवली असता शॉपीतून बीअर विकत घेऊन त्याच्याच समोर किंवा बाजूला पिणाऱ्यांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर बीअर पिणाऱ्यांची एवढी गर्दी होती की ‘काऊंटर’ पर्यंत पोहचणेही कठीण होत असल्याचे दिसले. काही शॉपी मालकांनी तर पिणाऱ्यांसाठी बसण्याच्या सोयीपासून, पंखे व खोल्यांचीही व्यवस्था केली आहे. बिनधास्त व सहज दारू पिता येत असल्याने या शॉपींकडे मोठ्या संख्येत तरुण वर्ग वळत आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, हे पाहता पोलीस प्रशासन आणि दारुबंदी विभागाने खुलेआम दारू पिण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीअर पिण्याऱ्यांसाठी खास खोल्या काही बीअर शॉपी मालकांनी बीअर पिण्यासाठी खास खोल्यांची व्यवस्था केली आहे. या खोलीचे वेगळे पैसे मोजावे लागतात. मात्र, बीअर संपली की खोली खाली करून देण्याची यात अट असते. काही ठिकाणी पिणाऱ्यांसाठी ओटे बनविण्यात आले असून पंख्यांची व मंद लाईटची सोय केली आहे. काही ठिकाण बंद दुकानांच्या पायऱ्या पिणाऱ्यांसाठी खुल्या करून देण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी उभे राहून रिचविण्याची सोय आहे. नागरिकांना आवाहन शहरातील काही बीअर शॉपींचा त्रास तरुणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याच्या तक्रारीवरून ‘लोकमत’ने हे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. आपल्यालाही हा त्रास होत असेल तर याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन पोलिसांकडे तक्रार करावी. नगरसेवकांकडेही तक्रार करू शकता. नगरसेवक जर त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करा. फ्लॅट, अपार्टमेंटच्या तळघरात सर्वाधिक शॉपी बहुसंख्य बीअर शॉपी या फ्लॅट, अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आहेत. तक्रारकर्त्यांच्या मते, दुसऱ्यांनी वेगळ्या कामासाठी विकत घेतलेली ही दुकाने तिसऱ्याला भाड्याने दिलेली आहेत. यातच हे गुंड प्रवृत्तीच लोक असल्याने कोणी विरोधात जात नाही. बीअर शॉपी सुरू करण्यासाठी आजू-बाजूच्या रहिवाशांचे किंवा फ्लॅट धारकांचे नाहरकत प्रमाणपत्रही त्यांच्याकडे नाहीत. या शॉपीमुळे अनेक रहिवाशांनी आपले फ्लॅट विकायला काढल्याची माहिती आहे.
बीअर शॉपी बनल्या बार
By admin | Updated: April 8, 2017 02:20 IST