लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे.दिनेश वसंतलाल यादव (वय ३८, रा. रमाईनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नगरसेवकाचे तर सुदरेश यादव असे साथीदाराचे नाव आहे. अजय शिवकुमार यादव (वय २९, रा. कपिलनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री ८.४० च्या सुमारास पॉवर ग्रिड चौकात रजत सोनटक्के यांच्या चायनीज ठेल्यावर आले होते. नूडल्स विकत घेत असताना तेथे रजत आणि सौरभ यादव यांच्यात वाद झाला. त्यामुळे अजय यादव यांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. रजतने त्याचे साथीदार दिनेश यादव, सुदरेश आणि शिव यादव या तिघांना फोन केला. ते लगेच रजतच्या चायनीज ठेल्यावर पोहोचले. त्यांनी अजय यादवला आधी हातबुक्कीने मारले. नंतर लाकडी दांड्याने मारहाण केली. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपी दिनेश यादव तसेच सुदरेश यादव या दोघांना अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार शिव यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मारहाण करणारा नगरसेवक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:26 IST