पुष्कर श्रोत्री : नवोदित रंगकर्मींना दिल्या अभिनयाच्या टीप्सलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तम नट होण्यासाठी आधी उत्तम माणूस होणे गरजेचे आहे. हे जमले तरच आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देता येते. निरीक्षण, परीक्षण आणि अवलोकन हे उत्तम अभिनयासाठी महत्त्वाचे निकष आहेत. नजरेला नजर देऊन आरशात स्वत:चा अभिनय स्वत:च तपासून पाहा. यातून आपल्याला मंचावर होणाऱ्या चुका आधीच टाळता येऊ शकतात, असा सल्ला अभिनेता पुष्कर श्रोत्री याने नवोदित रंगकर्मींना दिला. संजय भाकरे फाऊंडेशनतर्फे रविवारी सोनेगावात आयोजित रंगचर्चा कार्यक्रमात तो बोलत होता. यावेळी त्याच्यासोबत सचिन देशपांडे आणि सीमा घोगळे यांनीसुद्धा नाट्यक्षेत्रातील पूर्वतयारीबाबत माहिती दिली. पुष्कर पुढे म्हणाला, आज मुंबईला प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. मालिकांच्या माध्यमातून क्षणिक अभिनय वेळेवर तयार करून सादर करायचा असतो. पण एकांकिका किंवा नाटक हा आपल्याला जे जे येते ते पूर्ण सामर्थ दाखविण्याची संधी देते. रसिकांशी सुसंवाद साधण्याचे आणि स्वत: समाधानी होण्याचे माध्यम म्हणजे नाटक होय. आम्ही सर्व एकांकिकांच्या माध्यमातूनच आलो असल्यामुळे आज व्यावसायिक नाटकापर्यंत मजल मारू शकलो, याकडेही त्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भाकरे, वसंत वाहोकार व मेघना वाहोकार हजर होते. संचालन मंगेश बावसे यांनी तर आभार राखी वैद्य हिने मानले.
उत्तम नट होण्यासाठी उत्तम माणूस होणे गरजेचे
By admin | Updated: June 27, 2017 02:12 IST