योगेश पांडे
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्ज दाखल केला. २०१४ मध्ये बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. २०१४ ते २०२१ या सात वर्षांच्या कालावधीत बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीत तब्बल ३६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०१४ साली बावनकुळे, त्यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी मिळून एकूण ७ कोटी ४९ लाख ९६ हजार रुपयांची एकूण संपत्ती होती. त्यात ६५ लाख २७ हजारांची चल संपत्ती व ६ कोटी ९४ लाखांच्या अचल संपत्तीचा समावेश होता. २०१४ ते २०१९ या कालावधीत बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार बावनकुळे व त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावे मिळून एकूण ९० लाखांहून अधिकची अचल संपत्ती आहे, तर ३३ कोटी ८३ लाख ७७ हजार ११७ रुपयांची चल संपत्ती आहे.
अचल संपत्तीमध्ये नांदा, कोराडी, चिचोली, नरखेड, सुरादेवी, बाबुळखेडा ४ कोटी ११ लाख ५० हजारांची शेतजमीन, महादुला येथे २ लाख ७१ हजारांचे वडिलोपार्जित घर, नांदा येथील साडेबावीस कोटींची वाणिज्यिक इमारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बावनकुळे व त्यांच्या पत्नीवर १७ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज आहे. केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे १ कोटी २४ लाख ९८ हजार ५६३ रुपयांची अचल संपत्ती व १७ लाख १२ हजार ६२८ रुपयांची चल संपत्ती आहे.
बावनकुळेंकडे स्वत:ची कार नाही
शपथपत्रातील माहितीनुसार, बावनकुळे व त्यांच्या पत्नीकडे मिळून ९० लाख १९ हजार १७९ रुपयांची चल संपत्ती आहे. यात २२ लाख रुपयांचे दागिने, १३ लाख ३ हजार रुपयांची वाहने, ४१ लाख ३९ हजार ४६२ रुपयांच्या ठेवी व ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. बावनकुळे यांच्या नावाने एकही वाहन नाही. दोन्ही कारची नोंदणी पत्नीच्या नावे आहे.
कर्जाचा आकडादेखील वाढला
२०१४ साली बावनकुळे यांच्या कुटुंबीयांवर ३२ लाख ८७ हजार ९७१ रुपयांचे कर्ज होते. सात वर्षांत संपत्तीप्रमाणे कर्जाचा आकडादेखील वाढला असून, सद्यस्थितीत त्यांच्यावर १७ कोटी ४२ लाख ५८ हजार २६५ इतक्या रकमेचे कर्ज आहे.
दहा न्यायालयीन प्रकरणे
दरम्यान, बावनकुळे यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. यातील केवळ एका प्रकरणात न्यायालयीन खटला सुरू असून, आठ प्रकरणात न्यायालयात आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आलेले नाही.
नेमके शिक्षण किती?
२०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात बावनकुळे यांनी त्यांचे शिक्षण बीएस्सी द्वितीय वर्ष झाल्याचे नमूद केले होते. यंदाच्या शपथपत्रात मात्र हेच शिक्षण बीएस्सी प्रथम वर्ष उत्तीर्ण असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचे नेमके शिक्षण किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बावनकुळेंची संपत्ती
वर्ष - चल संपत्ती - अचल संपत्ती - कर्ज
२०१४ - ६६,२७,७४० - ६,९४,६९,००० - ३२,८७,९७१
२०२१ - ९०,१९,१७९ - ३३,८३,७७,११७ - १७,४२,५८,२६५