हायकोर्ट : पत्नीची याचिका फेटाळलीनागपूर : पत्नीच्या क्रूरतापूर्ण वागणुकीच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरविला आहे. तसेच या निर्णयाविरुद्ध पत्नीने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली आहे.७ सप्टेंबर १९९७ रोजी रमना मारोतीनगर येथील रहिवासी रमेशचे पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथील कवितासोबत (काल्पनिक नावे) लग्न झाले होते. यानंतर काही दिवसांतच कविताची वागणूक बदलली. ती पती व सासरच्या अन्य सदस्यांसोबत असभ्यपणे वागायला लागली. पती व सासू-सासऱ्याला शिवीगाळ करणे, हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसांत तक्रार दाखल करणे, विविध प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, पतीला मारहाण करायला धावून जाणे अशाप्रकारे ती वागत होती. कविताची आईसुद्धा वाईट पद्धतीने वागत होती. कवितासोबत एकाच छताखाली जीवन जगणे कठीण झाल्यामुळे रमेशने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. १९ एप्रिल २००६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर केला. या निर्णयाविरुद्ध कविताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर कविताची याचिका फेटाळून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.(प्रतिनिधी)
क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा निर्णय योग्य
By admin | Updated: July 6, 2015 03:02 IST