संपत्ती कराचा डाटा होणार आॅनलाईन : ३३ कॉम्प्युटर आॅपरेटरची नियुक्ती नागपूर : संपत्ती करात होत असलेली अनियमितता दूर करण्यासाठी आणि कर व्यवस्थेला आणखी प्रभावी बनविण्यासाठी आता मनपा प्रशासन बारकोड पद्धतीचा वापर करणार आहे. यात ‘टॅक्स’च्या पावतीवर बोरकोडसुद्धा नोंदवलेला राहील. बारकोड स्कॅन होताच संबंधित संपत्तीधारकाचा संपूर्ण डाटा समोर येईल. या व्यवस्थेला विकसित करण्यासाठी मनपाने आपल्या ई-गव्हर्नन्स विभागाला ही जबाबदारी सोपविली आहे. संपत्ती कर विभागाच्या कॉम्प्युटरायझेशनची गोष्ट मागील दोन वर्षांपासून केली जात आहे. तरीही सुमारे ३ लाख संपत्तीधारकांना आतापर्यंत मॅन्युअली टॅक्स पावती दिली जात आहे. संपत्तीधारकांची माहिती कॉम्प्युटराईज सिस्टीममध्ये फिड करून डाटा तयार करण्याचे काम संपत्ती कर विभागाला देण्यात आले आहे. संपत्ती कर विभागाची जबाबदारी सांभाळत असलेले उपायुक्त संजय काकडे यांनी सर्वप्रथम संपत्तीधारकांचे ‘डाटा एंट्री’ चे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ३३ कॉम्प्युटर आॅपरेटरकडे हे काम सोपविण्यात आले आहे. ते अतिरिक्त वेळेतही काम करतील. एका आॅपरेटरला दररोज किमान २५० एंट्री कराव्या लागतील. सध्या संपत्ती कराची पावती हाताने तयार केली जात आहे. संपत्ती कर भरल्यावर ती पावती दिली जाते. परंतु कर भरल्यानंतर पुढच्या करातसुद्धा ती रक्कम लागून येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित बिलांमध्ये तातडीने सुधार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संजय काकडे यांनी सांगितले की, बारकोड व्यवस्था लागू होताच एका क्लिकवर संपत्तीधारकांची संपत्तीबाबत पूर्ण माहिती उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)निश्चित वेळेतच करावे लागेल म्युटेशन नामांतर (म्युटेशन) साठी नागरिकांना मनपा कार्यालयाचे शेकडो चक्कर मारावे लागतात. तरीही ते काम होत नाही. त्यामुळे आता हे काम एका निश्चित कालावधीत करावे लागणार आहे. निश्चित वेळेत ते काम न झाल्यास ते काम आपोआपच पुढच्या अधिकाऱ्याकडे जाईल. मोठ्या संपत्तीचे होणार पुनर्मूल्यांकन शहरात अनेक संपत्ती अशा आहेत ज्यांच्यावर नाममात्र संपत्ती कर वसूल केला जात आहे. अशा संपत्तीची माहिती काढण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्याची यादीसुद्धा तयार करण्यात आली आहे. महिनाभरानंतर मोठ्या संपत्तीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले असून संपत्ती कर वसुली वाढण्याची शक्यता बळावली आहे.
टॅक्स पावतीला ‘बारकोड’चे कवच
By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST