लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीच बंद असल्याने राज्यभरातील विद्यापीठांमध्ये प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पदभरती बंदीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश १५ दिवसांत मागे घेण्यात येईल, असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूरचे आयोजन झाल्यानंतर पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
शासनाने मागील ४० टक्के पदभरतीला परवानगी दिली होती; मात्र ‘कोरोना’मुळे ४ मे रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. प्राचार्यांची पदे तसेच विद्यापीठातील संवैधानिक पदे भरण्यासंदर्भात शासनाने मंजुरी दिली आहे. आता प्राध्यापक भरतीसंदर्भात वित्त विभागाची परवानगी घेण्यात येईल व शासन निर्णय मागे घेण्यासंदर्भात १५ दिवसांच्या आत प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पदभरती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांशीदेखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा राज्यात विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात रत्नागिरी, पुणे, नाशिक व औरंगाबाद अशा चार ठिकाणी उपकेंद्रे स्थापन करण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
सर्व नवीन वसतिगृहे होणार ‘मातोश्री’
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व नवीन वसतिगृहांना ‘मातोश्री’ असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली. हे नाव देण्यामागे कुठलेही राजकारण नसून घरापासून दूर राहणाऱ्या मुला-मुलींना वात्सल्याचा अनुभव मिळावा म्हणून हे नाव निश्चित करण्यात आल्याचे कारण त्यांनी दिले.