लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधान यांच्या बळावरच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. विद्यार्थ्यांनो आपल्यालाही जीवनात मोठे व्हायचे असेल तर बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान आत्मसात करा, तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी येथे केले.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालीत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. शनिवारी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, डाॅ. कमलताई गवई प्रमुख प्रामुख्याने होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते.
सरन्यायाधीश भूषण गवई विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, जीवनात यशाची शिखरं गाठा पण आपल्या समाजाला विसरू नका. समाजाचेही आपण काही देणं लाागतो याची जाणीव ठेवा. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दादासाहेब गायकवाड, रा.सू.गवई, सदानंद फुलझेले, ना.ह. कुंभारे, वा.को. गाणार यांच्यामुळेच डाॅ.आंबेडकर महाविद्यालय हे उभे राहू शकले. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्या. अनिल किलोर, स्मारक समितीचे सदस्य डाॅ. राजेंद्र गवई, डाॅ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डाॅ. प्रदीप आगलावे, एन.आर.सुटे, भंते नाग दीपांकर, ॲड. आनंद फुलझेले, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, कास्ट्राईबचे कृष्णा इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य दीपा पाणेकर यांनी भूमिका विषद केली. महाविद्यालयाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडविले : मुख्यमंत्री फडणवीसडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दार उघडे करून दिले व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. गेल्या ६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सावी बुलकुंडे (युपीएससी उत्तीर्ण), चारूल विटाळकर, (सीए),रुचिका बाकरे, (सीए)भूमिका अग्रवाल आणि निखील मोटघरे यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश गवई व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते स्मृती चिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.