लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत डिगडोह-नीलडोह नळ याेजनेच्या कामासाेबत पाइपलाइन टाकण्याचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. यात कंत्राटदाराने रस्त्यावर खाेदकाम केले. मात्र, ते खड्डे वारंवार विनंती करूनही बुजविले नाही. त्यामुळे रहदारीच अडचणी येथे असल्याने कंत्राटदाराने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सरपंच इंद्रायणी कालबांडे व उपसरपंच कैलास गिरी यांनी संयुक्तरीत्या सांगितले की, डिगडोह-नीलडोह येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४४ कोटी रुपयांच्या नवीन नळयोजनेचे काम सुरू आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी कंत्राटदाराने डिगडोह येथील सहाही वॉर्डात जेसीबीने सिमेंट पक्के रस्ते व काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तोडल्या.
पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे त्याच कंत्राटदाराचे काम आहे. त्याने रस्ते व नाल्यांची जुजबी दुरुस्ती करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे माेठे झाले असून, ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे कंत्राटदाराला वारंवार विनंती करूनही ताे रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करण्यास टाळाळाळ करीत असल्याचेही सरपंच इंद्रायणी कालबांडे व उपसरपंच कैलास गिरी यांनी सांगितले.
ही समस्या साेडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली असून, कंत्राटदाराने रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास धरणे आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात सरपंच इंद्रायणी काळबांडे, उपसरपंच कैलास गिरी, ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे, बंडू भोंडे, प्रदीप इंगोले, राजेश बोरकर, हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर कोकुडे, प्रिया वासनिक, सीमा शर्मा, मीना वानखेडे, रश्मी साबळे, ज्योती कथलकर, प्रजेश तिवारी, लता पांडे यांचा समावेश हाेता.