नागपूर : सरकारने सहल परवान्याच्या नावाखाली ओला, मॅजिक विंग्ज, मेरू, इजी, झेट या कंपन्यांना प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात आणल्यामुळे आॅटोरिक्षाचालकांची भाकरी हिसकावली जात आहे. सरकारने प्रवासी वाहतुकीचे खाजगीकरण करण्याचा डाव आखला आहे. सरकार ई रिक्षा चालकांना प्रोत्साहन देऊन दोन गरिबांमध्ये संघर्ष निर्माण करीत आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार आॅटोरिक्षा विम्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दोन वर्षांपूर्वी आॅटोचालकांसाठी कल्याणकारी मडामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी आॅटोचालक संघटना प्रयत्नरत आहे. काँग्रेस सरकारने महामंडळाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. मात्र भाजप-सेना सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांचा वेगळा त्रास आॅटोचालकांना सहन करावा लागत आहे. आॅटोचालकांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सरकार करीत असून, सरकारच्या निषेधार्थ ३० एप्रिलला देशव्यापी आॅटोरिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने पाठिंबा दिला आहे. ३० एप्रिलला विदर्भातील सर्व आॅटोचालक संघटना आपापल्या जिल्ह्यात धरणे देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी आनंद चौरे, मुकुंदा उईके, रवी तेलरांधे, पप्पू मिश्रा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षाचालकांचा ३० ला बंद
By admin | Updated: April 23, 2015 02:30 IST