कुही : घरगुती वीजपुरवठ्यासाठी डिमांड प्राप्त करून देण्याचे कारण सांगून ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वीज वितरण कंपनीतील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कुही येथे करण्यात आली. चंद्रशेखर दादाराव सोनसरे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रशेखर हा महावितरण कंपनीच्या कुही कार्यालयात प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. फिर्यादी ओमप्रकाश अंकुश पंधराम, रा. चापेगडी, ता. कुही यांना घरगुती वीजपुरवठा हवा होता. यासाठी त्यांना डिमांड पाहिजे होती. त्यांना वर्षभरापासून डिंमाड मिळत नव्हती. ही डिमांड मिळवून देण्यासाठी चंद्रशेखरने त्यांना ५०० रुपयांची मागणी केली. पंधराम यांनी या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात नोंदविली. सदर तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा रचला. महावितरणच्या कुही येथील कार्यालयात चंद्रशेखरने ३०० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, दीप्ती मोटघरे, चंद्रशेखर ढोक, सुभाष तानोटकर, मिलिंद हलमारे, वीरेंद्र ठाकूर आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक
By admin | Updated: March 25, 2015 02:28 IST