रेल्वे स्टेशन : आॅटोचालकाची सतर्कता नागपूर : देशी कट्ट्याच्या जोरावर एका रिक्षाचालकाला धमकावणाऱ्या आरोपीस एका आॅटोचालकाने पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशनसमोर घडली. शिव हल्केप्रसाद समसेरिया (३०) रा. बाराखोली जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास रिक्षाचालक अशोक लिल्या साहू (३०) रा. देवनगर हा आपल्या रिक्षावर बसून होता. दरम्यान आरोपीने त्याला सोडून देण्यास सांगितले, परंतु पैसे द्यायला मात्र तो तयार नव्हता. त्यामुळे रिक्षाचालकाने फुकटात सवारी नेण्यास नकार दिला. यावर आरोपीने त्याला शिवीगाळ केली आणि देशी कट्टा काढून त्याच्या कानपटावर लावली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. दरम्यान एक आॅटोचालक हे सर्व दृश्य पाहत होता. त्याने सतर्कता दाखवत आरोपीला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी शिव समेरिया याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी सुद्धा रेल्वे स्टेशन परिसरात तो लोकांना धमकावत होता. ठाण्यात आणल्यानंतरही त्याचा तोरा कमी झालेला नाही. पोलिसांनी त्याच्याजवळून देशी कट्ट्यासह, ६१०० रुपये, ड्रायव्हींग लायसन्स, आरसी बुक व एका डायरीसह काही सामान जप्त केले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रेल्वे स्टेशनच्या मुख्य द्वारासमोर जीआरपी आणि आरपीएफचे ठाणे आहे. या दोन्ही ठाण्याच्या मधोमध आरोपी देशी कट्ट्यासह धमकावत होता. तरीही दोन्ही पोलीस ठाण्याला त्याची माहिती मिळाली नाही. एका आॅटोचालकाने सतर्कता दाखविल्यावर ही घटना उघडकीस आल्याने रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशी कट्ट्यासह आरोपी अटकेत
By admin | Updated: July 13, 2014 01:07 IST