आॅनलाईन लोकमतमुलचेरा (गडचिरोली) : पती हैदराबादला कामासाठी गेल्याची संधी साधून घराजवळच्या महिलेवर मध्यरात्री तिच्या घरात शिरून बलात्कार करणाऱ्या आणि नंतर तिच्यासह तिच्या ५ वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या १९ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली. या दुर्दैवी घटनेत बालकाचा मृत्यू तर पीडित महिला मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.संजू विश्वनाथ सरकार (१९) रा.कांचनपूर असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेचा पती हा मागील एक महिन्यापासून हैदराबाद येथे काम करण्यासाठी गेला होता. पीडित महिला व तिचा मुलगा साहील हे दोघेच घरी राहात होते. रविवारी रात्री दोघेही मायलेक नेहमीप्रमाणे झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास आरोपीने खुर्चीच्या सहाय्याने घराच्या भिंतीवर चढून खोलीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महिलेवर बळजबरी केली. यावेळी बालक रडत असल्याने आरोपी संजूने त्याचा गळा आवळला. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. महिलेने आरडाओरड केली असता धारदार शस्त्राने तिचा गळा कापला. या घटनेनंतर पीडित महिला बेशुद्ध होऊन घरातच पडून होती. सकाळी ७ वाजता पतीने हैद्राबादवरून पत्नीच्या मोबाईलवर फोन केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने गावातील दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करून घरी निरोप पोहोचविण्यास सांगितले. ही माहिती सांगण्यासाठी गावातील इसम पीडित महिलेच्या घरी गेला असता महिला बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तिला तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. शुद्धीवर आल्यानंतर तिने आरोपीचे नाव सांगितले. डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले. दरम्यान जखमी महिलेला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना करण्यात आले. आरोपीवर बलात्कारासह खून व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे नोंदविले.
महिलेवर बलात्कार करून मायलेकाच्या हत्येचा प्रयत्न
By admin | Updated: June 19, 2017 18:03 IST