लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीसोबत फोनवर संपर्कात असलेल्या तरुणावर ८ ते १० आरोपींनी जोरदार हल्ला चढवला. लाकडी फळीने त्याला आणि त्याच्या मित्राला आरोपींनी बेदम मारहाण केल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले. आकाश प्रदीप इंगोले (वय २८) आणि त्याचा मित्र सूरज राऊत अशी जखमींची नावे आहेत.
आकाश एका तरुणीसोबत नेहमी फोनवर बोलत असल्याने आरोपी दादू उर्फ मयूर कोटेवार हा संतप्त होता. त्याने आकाशला यापूर्वी हटकलेही होते. तो ऐकत नसल्याचे पाहून सोमवारी रात्री ७.३० च्या सुमारास आरोपी कोटेवारने आपले ८ ते ९ साथीदार जमा केले. या सर्वांनी आकाशला एमआयडीसीतील वानाडोंगरीत घेरले. त्याला आणि त्याचा मित्र सूरज राऊत याला बाबडे ले-आऊटमधील मैदानात नेले. तेथे लाकडी फळीने आकाशच्या डोक्यावर, कानावर, खांद्यावर जोरदार फटके मारून गंभीर जखमी केले. आकाशला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरजलाही आरोपींनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळाले. गंभीर अवस्थेत आकाश आणि सूरजला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींच्या बयाणावरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दादू कोटेवार आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
-----