कोलकाता : माणिकतला विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार व माजी फुटबॉलपटू कल्याण चौबे यांच्यावर रवींद्र भारती विद्यापीठ परिसरात हल्ला करण्यात आला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात चौबे यांनी पोलिसांसोबतच निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार दाखल केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असून बुथ एजंटसाठी रवींद्र भारती विद्यापीठ परिसरात बनविण्यात आलेल्या शिबिरात निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यात सहभागी एजंटना भेटण्यासाठी चौबे गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना २०० मीटर फरफटत नेण्यात आले. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलवर हल्ल्याचा आरोप करत रस्ता रोकोदेखील केला. तृणमूलचे वरिष्ठ नेते ब्रात्य बसू यांनी या आरोपांचे खंडण केले आहे.