सर्व्हर डाऊनमुळे उद्भवलेल्या समस्येवर तोडगा: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला बार्टीचे पत्र
उमरेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अखेरच्या दोन दिवसात एकाचवेळी अर्ज सादर करण्यासाठी गर्दी उसळल्याने सर्वच ठिकाणी सर्व्हर डाऊनच्या समस्येने निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना घाम फुटला. यामुळे तातडीने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) प्रभारी उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी २९ आणि ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जासह जात प्रमाणपत्र ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याची सूचना निर्गमित केली. अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने या समस्येवर उपाययोजना म्हणून हा तोडगा काढण्यात आल्याची बाब पत्रात नमूद आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची अथवा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता आहे. यामुळे कोणत्याही अर्जदाराची गैरसोय होऊ नये म्हणून सदर सूचना निर्गमित करण्यात आली. अर्जदारांची संख्या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी सुरू ठेवावीत असेही आदेशात म्हटले आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेल्या अर्जदारांची माहितीसुद्धा संबंधित कार्यालयाने पाठविण्याचेही मेघराज भाते यांनी म्हटले आहे. सदर ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायत उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.