लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यातील शेवटच्या टाेकावर वसलेल्या मसखापरा ते माळेगाव या डांबरीकरणाच्या रस्त्याचे चक्क मातीकाम करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय हाेताे. चिखलातून वाट काढताना वाहनचालक व गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, या रस्त्याने ये-जा करणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या डांबरी रस्त्यावर मातीकाम करणाऱ्या दाेषींवर कारवाई करीत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील मसखापरा,चंदकापूर, माळेगाव ही गावे डाेंगराळ भागात वसली आहेत. या भागात रस्त्याची समस्या नवीन नाही. परंतु मसखापरा ते माळेगाव या डांबरीकरणाच्या रस्त्याचे या भागातील खासगी क्रशर कंपनीने चक्क मातीकाम केले. त्यामुळे गावकऱ्यांना रहदारी करताना नाहक त्रास साेसावा लागत आहे. पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे.
विशेषत: क्रशर कंपनीतील जड वाहतुकीच्या ट्रकमुळे तीन किमीपर्यंत रस्ता पूर्णत: उखडला. गिट्टीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले हाेते. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी क्रशर कंपनीने डांबरीकरणाच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता लाल मातीचा वापर केला. मातीकाम केल्यानंतर पहिल्याच पावसात रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला आहे. दुचाकी वाहने फसण्याचे प्रकार हाेत असून, चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माळेगाव तालुक्याच्या अखेरच्या टाेकावर असल्याने या भागातील रस्ते निर्मितीकडे संबंधित विभागासह कंत्राटदारांचे दुर्लक्ष हाेते. शिवाय, स्थानिक लाेकप्रतिनिधीदेखील या भागातील समस्यांकडे कानाडाेळाच करतात. त्यामुळे खासगी क्रशर कंपनीने डांबरीकरणाच्या रस्त्याचे मातीकाम केल्याचा प्रताप केल्याचा आराेप नागरिकांचा आहे. दाेषींवर कारवाई करून या रस्त्याची तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
260621\img-20210626-wa0193.jpg~260621\img-20210626-wa0192.jpg
===Caption===
डांबरी रस्ता चक्क लाल मातीचा~डांबरी रस्ता चक्क लाल मातीचा