लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाऊर्जा कृषिपंप धोरणाच्या प्रसारासाठी महावितरणकडून संपूर्ण राज्यात १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान ‘कृषी ऊर्जा पर्व’ राबविण्यात येत आहे. यानिमित्त नागपूर परिक्षेत्रात ऊर्जा पर्वाचा शुभारंभ वडोदा येथे करण्यात आला. यावेळी थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार, शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी आणि ऊर्जा धोरणाबाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी एक गाव एक दिवस या अभियानांतर्गत गावातील विजेच्या पायाभूत सुविधांची दुरुस्ती आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले.
मौदा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या वडोदा येथे आयोजित ऊर्जा पर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी होते. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून योजनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनीही यावेळी महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती दिली. कार्यकारी अभियंता रूपेश टेंभुर्णे, सरपंच इंगोले, माजी सरपंच ज्ञानेश्वर आकरे इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महावितरणच्या वतीने शिवाजी चौकातून बैलबंडीने मिरवणूक काढून गावात जनजागृती करण्यात आली.