नागपूर : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेने तयारी सुरू केली आहे. लहान मुले व नागरिकांसाठी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात २०० बेडची व्यवस्था करून काेविड केअर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. यासाठी १.२९ काेटी रुपयांचे प्रावधान करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मनपाच्या येत्या सभेत ताे मंजूर करण्यात येणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी राेडवर स्थित तीन माळ्यांची प्रशासकीय इमारत मनपाने अधिग्रहित केली आहे. इमारतीत आयसीयूचे ३०, एनआयसीयूचे २० आणि ऑक्सिजनच्या १५० बेडची व्यवस्था करण्यात येईल. अत्यावश्यक काम असल्याने कार्याेत्तर मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात येणार आहे. यावरून महापालिका प्रशासनाने संबंधित काेराेना केअर सेंटरसाठी काम सुरू केले आहे. राज्य व केंद्र शासनातर्फे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी तयार राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामुुळे मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात स्थिती खूप ढासळली हाेती आणि शाेधूनही बेड सापडत नव्हते. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आताच पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा पुन्हा शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागेल.
ऑक्सिजन प्लांटचे काम ठप्प
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. मात्र काेराेनाचा प्रकाेप कमी पडताच सारे प्रयत्न कमजाेर झाले आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी ही चांगली वेळ हाेती. पाचपावली सूतिकागृह, आयसाेलेशन रुग्णालयात प्लांट लावण्यात आले आहेत.